प्रवरा कालव्यांमध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी मंगळवारी दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. त्याला दोन दिवस उलटूनही या मुलांची अद्याप ओळख पटलेली नाही. दोन्ही मुले दहा वर्षे वयाची असून पोलीस या मुलांच्या नातेवाइकांचा कसून शोध घेत आहेत.
भंडारदरा धरणातून प्रवरा कालव्यांना सध्या शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. उन्हाची काहिली वाढत असल्याने कालव्यांवर पोहण्यासाठी मुले, तरुणांची झुंबड उडते. तालुक्यातील राजुरी शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजता तर दुपारी २ वाजता बाभळेश्वर शिवारात प्रवरा कालव्यात दोन दहावर्षीय मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. लोणी पोलिसांनी राजूर, अकोले, संगमनेर, आश्वी या ठिकाणच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मुले बेपत्ता झाली आहेत का, याबाबत तपास केला. परंतु या मुलांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अद्यापि कोणीही न पुढे आल्याने या मुलांच्या घटनेबाबत गूढ वाढले आहे. पोहताना ही मुले कालव्यात गेली असावी, शिवाय दोघांचे मृतदेह दूर अंतरावरून वाहत आले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या दोन्ही मुलांचे मृतदेह लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आले असून, या मुलांची ओळख पटवण्यासाठी कोणीही नातेवाईक पुढे न आल्यास या मुलांच्या मृतदेहाचे गुरुवारी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती लोणी पोलिसांनी दिली. मृत दोन्ही मुले कुठली, त्यांचे नातेवाईक कोण, याबाबत लोणी पोलिसांना अद्याप माहिती मिळालेली नसल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. या दोन्ही मुलांच्या घटनेबाबत लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.