गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर तेराव्यालाच व्यासपीठावर आलेल्या आमदार पंकजा मुंडे यांनी ‘मोडेल पण वाकणार नाही’ असे सांगत स्वतला सावरले. दुसरीकडे भगवानगडावरून आता ‘मी रडणार नाही तर लढणार’ म्हणत दुखी कार्यकर्त्यांना धीर दिला. आता महिनाभरानंतर पक्षाच्या व्यासपीठावरून ‘मी पक्षाकडे कोणतेही पद मागणार नाही, जे मिळवायचे ते संघर्ष करूनच मिळवेल’ असे ठणकावत दिवंगत मुंडेंचे सत्तापरिवर्तनाचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प सोडला. मुंडेंच्या निधनाने सरभर झालेल्या मुंडेसमर्थक लाखो कार्यकर्त्यांमधून आता पंकजाच आमच्या ‘ताईसाहेब’ असा सूर आळवला जाऊ लागला आहे.
कोणताही राजकीय वारसा नसताना गोपीनाथ मुंडे यांचा ‘नाथ्रा ते दिल्ली’ हा राजकीय प्रवास कायम संघर्षांचा राहिला. साडेचार वर्षांचा युतीचा काळ अपवाद वगळता मुंडे कायम विरोधात लढत राहिले. मिळालेली सत्तेची व पक्षांतर्गत पदे, प्रतिष्ठा यासाठी टोकाचा संघर्ष करावा लागला. शहरी चेहरा असलेल्या भाजपला गाव-वस्तीवर पोहोचवून पक्षाला सुवर्णकाळ मिळवून देण्यात मुंडेंचा वाटा मोठा राहिला. प्रस्थापित सत्तेविरुद्धच्या त्यांच्या संघर्षयात्रांनी इतिहास घडवला. आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६५ व्या वर्षी केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली. पण अवघ्या आठ दिवसांत किरकोळ अपघातात त्यांचे निधन झाले. त्यानंतर मुंडेंच्या राज्यभरातील समर्थकांपुढे आता काय, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, अंत्यविधीच्या वेळी भावना अनावर झालेल्या लोकांना आमदार पंकजा मुंडे यांनी नियंत्रित केले. त्याच वेळी आभाळाएवढे दुख कोसळले असताना पंकजा यांच्यात असलेल्या मुंडेंच्या नेतृत्वगुणांचा वारसा दिसून आला. वडिलांवर अग्निसंस्कार केल्यानंतर तेराव्याच्या कार्यक्रमात पंकजा यांनी पहिल्यांदा भावनांना वाट मोकळी करून दिली. मला वडिलांनी स्वाभिमान शिकवला. त्यामुळे कोणाशीही तडजोड न करता वडिलांना दिलेला शब्द पाळणार. मोडेन पण वाकणार नाही, अशा शब्दांत पंकजा यांनी आगामी दिशा स्पष्ट केली.
वंजारी समाजासह अठरा पगड जातीच्या ऊसतोड मजुरांचे शक्तिपीठ असलेल्या भगवानगडावर अस्थिकलश घेऊन आलेल्या पंकजा यांनी उपस्थितांना ‘मी आता रडणार नाही तर लढणार’ अशी हाक देत दुखातून सावरले. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या वारस म्हणून आमदार पंकजा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांतून पुढे आली. प्रदेश भाजपनेही ठराव घेऊन मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली. त्यामुळे पंकजा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र, काहींच्या मते भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या पंकजा मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात राहावे, असाही सूर निघाला. परंतु स्वत: कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता पंकजा महिनाभर राज्य व देशातून आलेल्या मुंडेंच्या चाहत्यांना भेटत राहिल्या.
मुंडे यांच्या मृत्यूनंतर बरोबर महिन्याने, ३ जुलस मुंबईत प्रदेश भाजपची बठक झाली. या वेळी पक्षाच्या व्यासपीठावरून पंकजा काय बोलतात, याकडे सर्वाचेच लक्ष होते. पंकजा यांनी मात्र भावना व्यक्त करताना कणखर भूमिका मांडली. मुंडे यांनी पक्ष वाडी-वस्तीवर नेला. ते पक्षाला देतच राहिले. जे मिळवले ते संघर्ष करूनच. त्यामुळे मजबूत बापाची मी कणखर लेक असल्याने मी पक्षाकडे कोणतेही पद मागणार नाही. जे मिळवेल ते संघर्ष करूनच. वडिलांनीच पक्षाला जोडलेल्या लाखो लोकांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटणार आहे आणि सत्तापरिवर्तनाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचणार असल्याचे त्यांनी या निमित्ताने ठणकावून सांगितले.
दरम्यान, पंकजा यांच्या कणखर भूमिकेमुळे सरभर झालेल्या राज्यभरातील मुंडेसमर्थक कार्यकर्त्यांमध्ये जान आली असून आता यापुढे पंकजाच आपली ताईसाहेब, तीच आपले भविष्यातील नेतृत्व असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. सोशल मीडियातूनही पंकजा याच ताईसाहेब, त्याच राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असे संदेश फिरू लागले आहेत.