|| एजाज हुसेन मुजावर

निवडणूक जवळ आल्याने इच्छुकांकडून मतदारांना देवदर्शनही

सोलापूर : ओबीसी आरक्षण आणि नवीन प्रभाग रचना आराखड्याच्या अंतिम निश्चितीबाबत संभ्रम दिसत असताना सोलापूर महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. प्रकल्पाने सर्वांचा भ्रमनिरास झालेला असतानाच आता गल्लीबोळात नवनवीन विकासकामांचा शुभारंभ अगदी धूमधडाक्यात सुरू सुरू आहे. शेकडो कोटींच्या या विकासकामांसाठी लागणारा निधी कोठून आणि कधी उपलब्ध होतोय, हे कळायला मार्ग नाही. निवडणुकांच्या तोंडावर अनेकविध विकासकामांची कुदळ मारणे, नारळ फोडणे, एकमेकांचे कौतुक करणे अशा एककलमी कार्यक्रमांचा नुसता धडाका सुरू आहे. दुसरीकडे कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने मतदार व कार्यकर्त्यांना संतुष्ट करण्यासाठी जेवणावळीपासून ते देवदर्शन घडवून आणण्यापर्यंतचा सिलसिला पाहायला मिळत आहे. बालाजी तिरुपतीच्या दर्शनासाठी थेट हवाई सफरही घडविली जात आहे. हे सारे केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून चालले आहे. आजी, माजी आणि भावी नगरसेवकांकडून समाजसेवेबरोबरच सौजन्य मास पाळले जात असल्यामुळे सामान्य जनताही अशा समाजसेवांचा, सौजन्यतेचा लाभ घेत आहे.

गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता राहिली असली तरी सत्ताधारी म्हणून भाजपला प्रभाव पाडता आला नाही. उलट, खालच्या पातळीवर गेलेली गटबाजी, कमालीची बेशिस्त, भांडणे, वादविवाद हेच पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपच्या कारभारावर तुटून पडण्याऐवजी स्वत:चा कणा हरवून बसलेले विरोधक असाच निराशाजनक माहोल सोलापूरकरांनी अनुभवला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीचे नगारे वाजत असताना बेशिस्तीचा भाजप आणि विस्कळीत, विश्वास गमावलेले आणि पलटीबाज विरोधक पाहिले तर कोणाच्या बाजूने कौल द्यावा, याचे कोडे मतदारराजाला पडायला लागले आहे.

 आगामी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असे प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार-साडेचार वर्षांत एकच अपवाद वगळता अर्थसंकल्पही मांडता न आलेल्या भाजपने निवडणुकीच्या तयारीसाठी विशेष जोर लावला आहे. नवमतदार नोंदणीपासून बूथ कमिट्या आणि इतर आवश्यक बाबींपर्यंतचे सूक्ष्म नियोजन आखण्यात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येते. गेल्या साडेचार वर्षे महापालिकेचा कारभार करताना माजी पालकमंत्र्यांनी विजय देशमुख आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात आडवे विस्तव जात नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करून दोन्ही देशमुखांना सज्जड दम भरला होता. तरीही पुढे देशमुखीचा वाद सुरूच होता. आता कुठे गटबाजीचे दर्शन थांबले आहे. उलट, गटबाजी होतीच कुठे, असा प्रतिप्रश्न भाजपची मंडळी बेरकीपणाने उपस्थित करीत आहेत. परंतु गटबाजी नाकारली जात असली तरी पक्षातील वाढत्या बेशिस्तीचे काय, हा प्रश्न उरतोच. पालिका सभागृहात आपल्या पक्षाच्या महापौरांनी एखाद्या विषयावर भाष्य करण्यास परवानगी नाकारणे, त्यामुळे महापौरांच्या पीठासनाकडे थेट पाण्याची प्लास्टिक बाटली भिरकावणे, परिणामी, संबंधित स्वपक्षीय ज्येष्ठ नगरसेवक निलंबित होणे अशा घटना ताज्या असतानाच दुसरीकडे उपमहापौर राजेश काळे यांची विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तडीपारी होणे या घटना सत्ताधारी भाजपची पुरती शोभा वाढविणाऱ्या ठरल्या आहेत. यात भाजपची प्रतिमा कलंकित झाली असता संबंधित दोषी नगरसेवकांवर, पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे धाडस भाजपला दाखविता आले नाही. अशी कारवाई केली तर संबंधित नगरसेवक पक्षापासून दूर जाऊ शकतात आणि त्याचा परिणाम सत्तेचे समीकरण कायम ठेवण्यावर होऊ शकतो. म्हणजेच महापालिकेतील सत्ता धोक्यात येऊ शकते, याची चिंता कदाचित भाजपने बाळगली असावी. परंतु भाजपअंतर्गत या साऱ्या गोंधळी वातावरणाचा लाभ घेण्याची क्षमता तरी विरोधकांकडे किती म्हणावी? विरोधकांमध्ये शिवसेना-२१, काँग्रेस-१४, एमआयएम-९, राष्ट्रवादी-४ याप्रमाणे मर्यादित ताकद आणि तेवढेच विखुरलेपण दिसून येते. एवढेच नव्हे तर विरोधकांमध्येच एकमेकांच्या पळवापळवीचे प्रकार वाढले आहेत.

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि अलीकडे शिवसेनेच्या माध्यमातून आमदारकी पदरात पाडण्यात अयशस्वी झालेले महेश कोठे हे महापालिकेत जवळपास चार वर्षे विरोधी पक्षनेते होते. परंतु ते प्रभाव पाडू शकले नाहीत व  त्यातून त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. शिवसेना सोडून त्यांनी आता राष्ट्रवादीशी घरोबा केला आहे. त्यांनी शिवसेना आणि काँग्रेससह एमआयएम व अन्य पक्षांची ताकद फोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परिणामी, काँग्रेस आणि शिवसेनेसह एमआयएम आदींचे शत्रुत्व कोठे यांनी ओढवून घेतले आहे.

विरोधकांत बेदिली वाढण्याची चिन्हे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महापालिकेची आगामी निवडणूक महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचे संकेत दिले आहेत. म्हणजेच पालिका निवडणुकीत महेश कोठे यांचे महत्त्व वाढण्याची शक्यता गृहीत धरताना दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची आघाडी कशी तयार होणार, याबाबतही प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळत आहे. भाजपला रोखण्यापेक्षा आपापसातील बेदिली वाढण्याचीच चिन्हे विरोधकांत दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध कार्यक्रम आखत असताना पुन्हा सत्ता राखण्याविषयीचा विश्वास भाजपला वाटत आहे.