मांजरा धरणाच्या पात्रात अत्यल्प पाणीसाठा आहे. गेले वर्षभर अचल साठय़ातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाण्याने तळ गाठल्यानंतर धरणात चर खोदून पाणी उपलब्ध करता येईल, त्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी शुक्रवारी दिले.
लातूर, केज, अंबाजोगाई, धारूर व कळंब शहरांना पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठय़ाची प्रत्यक्ष धरणावर जाऊन जैस्वाल यांनी पाहणी केली. या वेळी लातूर, उस्मानाबाद, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाणीपुरवठय़ाबाबत उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले. लातूर शहराला रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी प्रकल्पातून पाणी पुरवावे. जलवाहिनी योजना वेळेत पूर्ण न झाल्यास जनतेला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जावा. मांजरात जे उपलब्ध पाणी आहे त्याचे कमीत कमी बाष्पीभवन व्हावे, या साठी उपलब्ध पाणीसाठय़ावर रसायन टाकण्याचे आदेशही उस्मानाबाद व बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मांजरा धरणात प्रत्यक्ष किती पाणीसाठा आहे, तो किती कालावधीपर्यंत पुरेल? याची माहिती जैस्वाल यांनी घेतली. लातूर, उस्मानाबाद व बीडचे जिल्हाधिकारी, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग, उपायुक्त शिवाजी िशदे, विविध नगरपरिषदांचे मुख्याधिकारी व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंतेही उपस्थित होते. धरणाची पाहणी केल्यानंतर केज येथे जैस्वाल यांनी सर्वासमवेत बठक घेतली.
गेले वर्षभर नागरिकांनी पाणी जपून वापरण्यास सहकार्य केले. आता सध्याचा काळ चिंताजनक असून नागरिकांनी आवश्यक तितकेच पाणी वापरावे. प्रशासन यंत्रणेमुळे पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी वाया गेल्याचे आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ताकीदही देण्यात आली.