पाकिस्तानातील सरकारी यंत्रणेपासून तर थेट गृहसचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी दहशतवादविरोधी खटले चालविण्यात आडमुठेपणा घेत असल्याचे निरीक्षण ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी नोंदविले आहे. येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात ‘दहशतवाद आणि आपण’ या विषयावर बोलताना अ‍ॅड. निकम यांनी पाकिस्तानातील स्थिती मांडली.
अजमल कसाबसह अन्य अतिरेक्यांविरुद्ध पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईच्या प्रगतीची पडताळणी आणि तेथील न्याय आयोगाच्या मुंबई दौऱ्यापूर्वीची तयारी करणे असा उद्देश ठेवून आपण भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर पाकिस्तानमध्ये गेलो होतो, त्या वेळी आपणास तेथील आडमुठेपणाचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त अ‍ॅड. निकम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पाकिस्तानमधील आमची भेट गुप्त ठेवण्यात आली होती. इस्लामाबादजवळील न्यायालयात दहशतवादविरोधी खटला महिन्यातून एक दिवस चालतो. त्यामुळे मुंबईवरील २६-११च्या दहशतवादी हल्ल्याचा खटला चालविण्यासाठी जलद न्यायालय का चालविले जात नाही, अशी आपण विचारणा केल्यावर दहशतवादी खटले भरपूर आहेत आणि न्यायालय एकच असल्याचे उत्तर पाक अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.