तेल व नैसर्गिक वायू मंडळाच्या तेल विहिरींवर काम करणाऱ्या कामगारांचा गेल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या तराफ्यामधून इंधन गळती होत असल्याने मच्छिमार चिंतेत आहे. तौते चक्रीवादळाच्या तडाख्यात हा तराफा सापडल्याने तो लाटांनी पालघर तालुक्यातील वडराई समोरील समुद्रात १८ मे रोजी वाहून आला होता. या तराफ्यावरील १३७ कामगारांची सुटका करण्यात आली होती, मात्र हा तराफा तसाच समुद्रात राहिला होता.

आता या तराफ्यातून मोठ्या प्रमाणात इंधन गळती सुरु झाल्याने मत्स्यजीवांना धोका उद्भवल्याचे मच्छीमार सांगत आहेत. त्यामुळे मासेमारीवर संकट ओढवल्याचेही मच्छिमार सांगत आहेत. याचबरोबरीने या परिसरातील खाडीतील लहान माशांना तेल सदृश्य वास येत असल्याचे काही मच्छीमार सांगत आहेत. हा तराफा लवकरात लवकर येथून हटवावा अशी मागणी येथील मच्छीमारांनी केली आहे.

तराफ्यातून होत असलेल्या तेलगळतीच्या पार्श्वभूमीवर तराफ्याच्या आजूबाजूच्या परिसरात इंधन समुद्रात पसरू नये यासाठी सुरक्षा कठडे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे इंधन समुद्रात इतरत्र पसरणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. याचबरोबरीने या तराफ्यात असलेले ८० हजार लिटर इंधन बाहेर काढण्यासाठी पर्यावरण विभागाच्या व संबंधित प्राधिकारी अधिकाऱ्याच्या परवानगीनेच ते काढले जाणे अपेक्षित असल्यामुळे परवानगी घेण्यासाठी संबंधित तराफा कंपनीने मागणी केली असल्याचे सातपाटीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

याचबरोबरीने मासेमारी धोक्यात असल्याने हा तराफा हटवावा ही मागणी मच्छीमारांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर तराफा कंपनीला हा तराफा लवकरात लवकर हटवावा अशी सूचना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माहीम-केळवे बंदर निरीक्षक यांनी केली आहे.