नवी दिल्ली :एका आर्थिक वर्षांत बँकेमध्ये २० लाख रुपये जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी किंवा चालू खाते उघडण्यासाठी कायम खाते क्रमांक (पॅन) किंवा आधार क्रमांकाचा उल्लेख करणे अनिवार्य आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) बुधवारी काढलेल्या अधिसुचनेद्वारे स्पष्ट केले.

अधिसुचनेनुसार, एका आर्थिक वर्षांत २० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम बँकेतून अथवा पोस्टातील खात्यांतून काढताना किंवा बँकेत जमा करताना तसेच ग्राहकाला बँकेत चालू खाते उघडण्यासाठी पॅन आणि आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक असेल. बँक, पोस्ट ऑफिस आणि सहकारी संस्थांना एका आर्थिक वर्षांत २० लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या ठेवी आणि पैसे काढण्याच्या ग्राहकांच्या व्यवहारांचा अहवाल प्रत्यक्ष कर मंडळाला द्यावा लागेल.

सध्या, प्राप्तिकर विभागाशी संबंधित सर्व संप्रेषण, पत्रव्यवहारांमध्ये आणि विशिष्ट स्वरूपाच्या आर्थिक व्यवहारात प्रवेश करताना करदात्याने पॅन नमूद करणे आवश्यक आहे. तथापि, परकीय चलन खरेदी करणे किंवा बँकांमधून मोठय़ा प्रमाणात पैसे काढणे यांसारख्या उच्च-मूल्याच्या व्यवहार करणाऱ्या व्यक्तीकडे ‘पॅन’ नसल्यास, त्या बदल्यात आधार क्रमांक नमूद करण्याची तरतूद २०१९ सालच्या वित्तीय विधेयकातील तरतुदींनुसार करण्यात आली आहे.

अर्थ-व्यवहारात पारदर्शकतेसाठी.. नवीन दंडकामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येणे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला अपेक्षित आहे. यातून केंद्र सरकारला व्यवस्थेतील रोख रकमेच्या हालचालीचे निरीक्षण करता येईल. संशयास्पद उलाढालीतून कमावलेला पैसा बँकेत ठेवरूपात राखणे आणि काढण्याला पायबंद घातला जाईल.