मुंबई : ‘नमस्कार, मी अरविंद सावंत बोलतोय. मी दक्षिण मुंबई या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवित आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी मी निवडणूक लढवित आहे, आलेल्या कॉलवर हे शब्द ऐकल्यानंतर कान टवकारलेल्या मतदारांना गिरणीची चिमणी या निशाण्यासमोरील बटण दाबण्याचे आवाहन ऐकू येते आणि मतदार गोंधळून जातात.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेल्या अरविंद नारायण सावंत यांच्या प्रचारार्थ रेकॉर्डेड व्हॉईस कॉल येत आहे. याच मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद गणपत सावंत निवडणूक लढवित आहेत. नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराच्या रेकॉर्डेड व्हॉइस कॉलमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होवू लागला आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अरविंद गणपत सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ‘मशाल’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. परंतु त्यांचे नाव आणि आडनावाशी साधर्म्य असलेले अरविंद नारायण सावंत हे अपक्ष उमेदवार म्हणून याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ‘गिरण्यांची चिमणी’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. परंतु हे अपक्ष उमेदवार दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील बहुसंख्य मतदारांशी रेकॉर्डेड व्हॉइस कॉलद्वारे संवाद साधत आहेच. त्यामुळे नवमतदार व विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
जोगेश्वरी येथे वास्तव्यास असलेले अपक्ष उमेदवार अरविंद नारायण सावंत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपण गिरणी कामगाराचा मुलगा असून गिरणी कामगारांना न्याय मिळावा व त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. तसेच त्यांचाच विचार पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
अपक्ष उमेदवाराचे नाव व आडनाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अरविंद गणपत सावंत यांच्याशी मिळतेजुळते नाव आणि आपण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत, असा ध्वनीमुद्रीत संदेश यांमुळे मतदारांचा क्षणभर गोंधळ उडत आहे.
रेकॉर्डेड व्हॉइस कॉलचा दर किती?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध उमेदवारांनी रेकॉर्डेड व्हॉइस कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सॲप मेसेजद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात १५ लाखांहून अधिक मतदार आहेत. एका रेकॉर्डेड व्हॉइस कॉलची किंमत ही अंदाजे १० पैसे, ‘एसएमएस’साठी अंदाजे ५ पैसे आणि व्हॉट्सॲप मेसेजसाठी अंदाजे एक ते दीड रुपये इतका दर आकारला जातो. अशा स्वरूपातील प्रचाराची जबाबदारी ही उमेदवारांनी प्रसिद्धी कंपन्यांवर दिली आहे.
दरम्यान, अपक्ष उमेदवार अरविंद नारायण सावंत यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे शिक्षण हे दहावीपर्यंत झालेले आहे. या अपक्ष उमेदवाराकडे एकूण १ लाख १३ हजार इतकी रक्कम आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर २ लाख रुपये आहेत.