राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीला अखेर निवडणूक आयोगाने परवानगी दिली असून शुक्रवारी ही बैठक होणार आहे. या बैठकीत वैद्यकीय पदव्युत्तरबाबत चर्चा होणार असून या बैठकीत वैद्यकीय प्रवेशाबाबत वटहुकूम निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाला परवानगी मिळावी, यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. गुरुवारी निवडणूक आयोगाने या बैठकीला हिरवा कंदील दाखवला आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर शुक्रवारी ही बैठक होणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीयची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यावर मराठा आरक्षण लागू करण्यात आल्याचा मुद्दा मान्य करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण लागू करण्यास मनाई केली. त्यामुळे सुमारे २९६ विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून जागा वाढवून घेण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत वैद्यकीय पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी वटहुकूम काढण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रवेश गमावण्याची वेळ आलेले सुमारे २९६ विद्यार्थी असून काहींना रिक्त जागांवर सामावून घेतले तरी अतिरिक्त जागा वाढविल्या, तरच सर्वाचे प्रवेश कायम राहतील.वैद्यकीय शिक्षण परिषदेला (एमसीआय)ही प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. मात्र केंद्रातील सध्याच्या सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नवीन सत्तेवर येणारे सरकारच जागा वाढवून देण्याचा निर्णय घेऊ शकेल, असे केंद्रातील उच्चपदस्थांनी राज्याला कळविले होते.