पत्नीच्या मागे हुंड्याचा तगादा लावून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल पिंपरीतल्या सांगवीमध्ये एका जवानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश महागावकर असे या जवानाचे नाव असून त्याची पत्नी ज्योती महागावकरने २० जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रकाशने लग्नानंतर पत्नी ज्योतीच्या मागे वारंवार पैशांचा तगादा लावला होता. तसेच तिचा शारीरिक आणि आणि मानसिक छळ केला असा आरोप ज्योतीच्या माहेरच्यांनी केला आहे.
ज्योती महागावकर यांनी २० जूनला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले होते. या आत्महत्येची माहिती त्याच दिवशी दुपारी २ वाजता समोर आली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. ज्योती आणि प्रकाश या दोघांचे लग्न १० एप्रिल २०१५ रोजी झाले होते. मात्र लग्नानंतर दोन महिन्यातच माहेरुन पैसे आण, म्हणून ज्योतीच्या मागे प्रकाशने तगादा लावला होता. तसेच तो तिचा छळही करत होता असा आरोप आता ज्योतीचे वडिल शिवाजी खोपडे यांनी केला आहे.
प्रकाश आणि ज्योती हे सांगवी भागात असलेल्या भाड्याच्या घरात राहात होते. या दोघांना सात महिन्यांची एक मुलगी आहे. प्रकाश महागावकर सैन्य दलात जवान म्हणून कार्यरत आहेत. ते कामावर गेले असताना २० जून रोजी ओढणीच्या मदतीने गळफास घेऊन ज्योती महागावकर यांनी आयुष्य संपवले. प्रकाश महागावकर घरी आले तेव्हा त्यांना पत्नीचा मृतदेह दिसला. ते मूळचे कोल्हापूरचे राहणारे आहेत.