होळीच्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यावर तलवारीने वार करणाऱ्या नगरसेवक पुत्रांविरोधात धुळेकरांचा असंतोष आता हळूहळू बाहेर येऊ लागला असून राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार व त्यांच्या दोन्ही मुलांची गुंडगिरी वाढण्यास पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आजवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न केल्याने दिवसेंदिवस त्यांची गुंडगिरी वाढत गेल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. नगरसेवक चंद्रकांत सोनार, त्यांचे मुलगे देवेंद्र व भूषण सोनार आणि त्यांचे साथीदार गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने जाणीवपूर्वक, कारण नसताना नागरिकांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, दुखापत करणे, सरकारी अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करणे असे प्रकार करत आहेत. त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असूनही त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई पोलीस प्रशासनाच्या वतीने झाली नसल्याने त्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढीस लागल्याचे शिवसेनेने निवेदनात म्हटले आहे. या दहशतीला आता पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अधिकारीदेखील बळी पडू लागले आहेत. सोनार यांच्यामागे राजकीय पाठबळ असल्याने पोलीस कठोर कार्यवाही करीत नाहीत. यापुढे पोलिसांनी राजकीय दडपणास बळी न पडता कठोर कारवाई करण्याची गरज आहे. शहराची कायदा सुव्यवस्था, शांतता सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी सोनार यांना राजकीय पाठबळ देणाऱ्यांचा शोध घेऊन चौकशी करावी, पाठबळ देणाऱ्यांवरदेखील गुन्हेगारी प्रवृत्तीला साथ दिल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हिलाल माळी, नगरसेवक रवींद्र काकड यांनाही या गुंडांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सोनार यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य धुळेकर त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नसल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.