वसई: विरारमधून अपहरण झालेल्या ४ वर्षांच्या चिमुकलीला ४८ तासांच्या आत शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. ही चिमुकली आपल्या कुटुंबियासह विरारच्या आकाशमार्गिकेवर झोपली असताना पहाटे ५ च्या सुमारास तिचे अपहरण करण्यात आले होते. ही मुलगी सुखरूप सापडली असली तरी तिचा अपहरणकर्ता मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही.

विरार रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आकाशमार्गिकेवर (स्कायवॉक) सबू सोनार (२४) ही मोलमजुरी करणारी महिला रहात होती. सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास तिची ४ वर्षांंची मुलगी संजना हिला कुणीतरी पळवून नेले होते. तिने दिवसभर मुलीची शोधाशोध केली, मात्र ती कुठे सापडली नाही. तिच्या आईने रात्री १० च्या सुमारास विरार पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी या चिमुकलीचा शोध घेतला असता ती विरार पूर्वेच्या सहकार नगर येथे आढळून आली. अपहरणकर्त्यांने तिला तिथेच सोडून पळ काढला होता.

आम्ही लगेच पथक तयार करून रात्रभर सीसीटीव्ही तपासत अपहरणकर्त्यांचा मागोवा घेत होतो. मुलगी आम्हाला सहकार नगर परिसरात सुखरूप आढळली. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्यावर कुठल्याही प्रकारचे अत्याचार झाले नसल्याचे विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांनी सांगितले. अपहरणकर्त्यांला लवकरच पकडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.