राज्यात आजपासून प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी लागू करण्यात आली असून प्रशासनाच्या माध्यमातून राज्यातील हॉटेल, दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. अशीच कारवाई पुण्यात देखील करण्यात येत आहे. आज सकाळपासून दोन वाजेपर्यंत आठ हजार ७११ किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील हॉटेल आणि दुकानदाराकडून जप्त केला आहे.

त्यांच्याकडून तीन लाख ६९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला अशी माहिती घनकचरा विभागाचे सुरेश जगताप यांनी दिली तर प्लास्टिक बंदीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.आज पासून राज्यात कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल बंदी असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिका,नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी पाहण्यास मिळत आहे तर नागरिकांनी प्लास्टिक बंदीचे समर्थन केले आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली.

या कारवाईमध्ये किराणा दुकानदार, बेकरी चालक, कपड्याचे शॉप यासह अनेक दुकानदारांवर कारवाई केली असून यात कॅरीबॅग आणि ग्लास असा माल मिळून ८७११ किलो आणि थर्माकोल ७५ किलो जप्त करण्यात आला आहे. या कारवाईतून तीन लाख ६९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. येत्या काळात अधिक तीव्र कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिक बंदीचे महत्व नागरिकांना सांगितले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कापड विक्रेते शुभम परदेशी म्हणाले की,राज्य शासनाकडून प्लास्टिक बंदी केल्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र या निर्णयाचे आमच्या सह सर्व व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे. यासाठी राज्य सरकारने पर्याय देण्याची गरज होती.यावर राज्य सरकार निश्चित विचार करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली.

ग्राहक संगिता जाधव म्हणाल्या की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्या निर्णयाचे मी स्वागत करीत असून मार्केटमध्ये आल्यावर मी कधी तरी प्लस्टिकच्या पिशवीमध्ये साहित्य घेऊन जात होते. मात्र आजपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केल्याने मी कापडी पिशवी घेऊन आले आहे. या निर्णयाचे पालन सर्वानी करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.