अल्वपयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या तसंच तिच्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या ७० वर्षीय आजोबांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याच कारणासाठी एक दिवस आधी हडपसर पोलिसांनी १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं होतं. ७० वर्षीय व्यक्तीवर पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. दोघेही एकाच इमारतीतील रहिवासी आहेत. हडपसरमधील फुरसुंगीजवळ ते राहतात.

‘संशयित अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करत असे, तसंच तिला अश्लील मेसेजही पाठवत होता. मुलीने आपल्या आई-वडिलांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी संशयिताला आपल्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. मात्र यानंतरही तो मुलीला त्रास देत होता. १३ सप्टेंबरपासून त्याने मुलीचा पाठलाग सुरु केला होता. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत एफआयआर दाखल केला’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

याआधी मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी हडपसर पोलिसांनी आपल्या वयाच्याच मुलीचा पाठलाग करणाऱ्या १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं होतं. मुलगा दहावीत शिकत असून, नववीत शिकणाऱ्या मुलीचा तो पाठलाग करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेव्हा मुलाने पाठलाग सुरु केला तेव्हा मुलीने त्याचा विरोध केला होता. यानंतर त्याने तिच्याशी भांडण करत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे’.