मंगला एक्स्प्रेसच्या अपघातामुळे नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक तब्बल तीस तासानंतर शनिवारी सकाळी अकरा वाजता पूर्ववत करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले. परंतु, सलग दुसऱ्या दिवशीही स्थानिक पातळीवरून सुटणाऱ्या काही रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या. केवळ लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडल्या जात असल्याने आणि त्या देखील उशिराने धावत असल्याने नाशिकरोड व मनमाड रेल्वे स्थानकात खोळंबलेल्या प्रवाशांची गर्दी कायम आहे.
घोटीनजीक शुक्रवारी सकाळी हजरत निजामुद्दिन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसचे डबे घसरून झालेल्या अपघातात दोन्ही बाजुचा एक-एक किलोमीटरचा रेल्वे मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. भुसावळ, मनमाड, दौंड, मुंबई येथील रेल्वेची अपघात मदत पथके, सुमारे ४०० कर्मचारी, १४० टन क्षमतेच्या क्रेन, जनरेटर, जेसीबी यंत्रणा आदींच्या मदतीने अपघातग्रस्त डबे बाजूला केल्यानंतर दोन्ही मागार्ंवरील नुकसानग्रस्त रुळांच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर करण्यात आले. त्यामुळे शनिवारी सकाळी अकरा वाजता या मार्गावरून तपोवन एक्स्प्रेस (डाऊन) आणि दुरांतो एक्स्प्रेस (अप) मार्गावरून सोडण्यात आल्याचे नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे प्रबंधक एम. बी. सक्सेना यांनी सांगितले. आदल्या दिवशी ज्या रेल्वे गाडय़ांचे मार्ग बदलले गेले, त्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा आता नेहमीच्या मार्गावरून धावत आहेत. या दिवशी केवळ मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-कुर्ला राज्यराणी एक्स्प्रेस व मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस तसेच भुसावळ-पुणे एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या. मुंबई-हावडा मेल, कुर्ला-राजेंद्रनगर, मुंबई-भुवनेश्वर सुपरफास्ट, मुंबई-नागपूर विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई नागपूर-मार्गे नांदेड एक्स्प्रेस या गाडय़ा १३ ते १७ तास उशिराने धावत आहे. मनमाड-नाशिक-मुंबई मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. अपघातात मृतांचा आकडा तीन असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. ज्या प्रवाशाची ओळख पटली नव्हती, त्याचे नांव राम परेश ठाकूर (२७) असे आहे. गंभीर जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, ६ किरकोळ जखमींना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. गंभीर जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रूपये तर किरकोळ जखमींना प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण १३ प्रवाशांना दोन लाख पाच हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती सक्सेना यांनी दिली. दोन दिवसांत आरक्षण रद्द झाल्यापोटी नाशिकरोड स्थानकातून ७०,३७५, मनमाड स्थानकातून २१ हजार रूपये तर रेल्वे तिकीटांच्या परताव्यापोटी अनुक्रमे १९,४५० व १७,००० रुपये प्रवाशांना परत देण्यात आले आहेत.
सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी
अपघाताचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या दुर्घटनेची रेल्वे सुरक्षा विभागाचे आयुक्त सोमवारी व मंगळवारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन चौकशी करणार आहेत. अपघातामागे रेल्वे मार्गाच्या देखभालीतील त्रुटी, दोन रुळांमधील अंतर तपासणाऱ्या यंत्रणेची ढिलाई अथवा जुन्या झालेल्या काही रेल्वे रुळांना तडा जाणे, त्यातील अंतर वाढणे, तुटणे अशी काही कारणे असू शकतात, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.