मुंबईत धो धो पाऊस आणि मराठवाडय़ात गेल्या तीन दिवसांपासून वाऱ्याचा वेग कमालीचा वाढला आहे. नक्षत्र बदलल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून मराठवाडय़ाच्या आठही जिल्हय़ांत कोठेही मोठा पाऊस झाला नाही. सरासरी ३४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, मृग नक्षत्रात साधलेली पेरणी टिकून राहील का, असा प्रश्न विचारत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कोमेन नावाच्या चक्रीवादळामुळे हवामानाची स्थिती पूर्णत: बदलली असल्याचे नांदेड येथील हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
दक्षिण गुजरात व राजकोट येथे निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. प्रतितास ७० ते ८० किलोमीटर सरासरी वाऱ्याचा वेग होता. नांदेडमध्ये तो ४२ किलोमीटर प्रतितास नोंदवला गेला. औरंगाबाद, बीड जिल्हय़ांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक असल्याचे सांगण्यात आले. वारे वाहू लागल्याने पावसाची शक्यता पुढील सहा-सात दिवस कमी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे केलेल्या पेरण्यांची चिंता ग्रामीण भागात वाढली आहे.
मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आनंदून गेला होता. नदी-नाले, ओढे भरले. काही ठिकाणी बंधारेही वाहून गेले. मात्र, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्हय़ांमध्ये पावसाने दडी मारली आहे. अन्य जिल्हय़ांतही पावसाची सरासरी या आठवडय़ात फारशी चांगली नव्हती. २२ जूनला आद्र्रा नक्षत्र सुरू झाल्यानंतर पावसाच्या स्थितीत मोठय़ा प्रमाणात बदल झाला. १९ ते २४ जूनदरम्यान मराठवाडय़ात सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्हय़ात ३० मिमी नोंदवला गेला, तर सर्वात कमी लातूर जिल्हय़ात २ मिमी पाऊस झाला. पावसाने दडी मारल्याने आणि पुढील सहा-सात दिवस पाऊस येण्याची शक्यता कमी असल्याने मराठवाडय़ाच्या नशिबी ‘वारे’ असे चित्र दिसू लागले आहे.