विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला तरी, दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. राज्यातील घोडाझरी, चारगाव, चंदई,कोराडी, पकडीगुडम,लभानसराड या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणांतील पाण्याच्या विसर्गामुळे नागपूर, अकोला, चंद्रपूर, बुलढाणासह अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुलढाणामधील मेहकर तालुक्यातील कोराडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने पूरस्थिती कायम आहे. पैनगंगा नदीच्या पुलावरून एक युवक वाहून गेल्याची माहितीही समोर आली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्यातील नगीनाबाग, सिस्टर वसाहत, पडोली या भागाला बसला आहे. तसेच जिल्हातील अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकंदर विदर्भात पावसाने विश्रांती घेतली असली तरी,  विदर्भात पूरस्थिती मात्र कायम आहे