जलबिरादरीचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध जलशास्त्रज्ञ राजस्थानमधील अनेक मृत नद्या पुन्हा जिवंत करून जलक्रांती घडवून आणणारे व वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून गौरविलेले राजस्थानचे पाणीवाले बाबा डॉ. राजेंद्र सिंग यांचे जलव्यवस्थापन या विषयावर वाडा येथील पी. जे. हायस्कूलच्या सभागृहात मंगळवार, ८ जानेवारी रोजी    दुपारी २ वाजता शेतकऱ्यांसाठी भव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
ठाणे ग्रामीण भागात कार्यरत असलेले वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ, संजीवन ग्रामीण वैद्यकीय सामाजिक प्रतिष्ठा व जायन्टस् ग्रुप ऑफ वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जलव्यवस्थापन व शेतीला पूरक व्यवसाय या विषयांवर ठाणे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसाठी हे मार्गदर्शक शिबीर आयोजित केले आहे.
कोकणासह ठाणे जिल्ह्य़ाची भातशेती सध्या शेतकऱ्यांना परवडेनाशी झाली आहे. उत्पादन खर्च जास्त व त्यामानाने भाताला मिळणारा अल्प बाजारभाव यामुळे जिल्ह्य़ातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत भाजीपाला लागवड, फुलशेती, फळशेतीचा पर्याय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असणारे मुंबई शहर ठाणे जिल्ह्य़ापासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र मुंबईला लागणारा भाजीपाला, फळे, फुले हे पुरविण्यात ठाणे जिल्हा मागे राहिला आहे. त्यामुळे यापुढे फक्त भातशेतीवर अवलंबून न राहता अन्य शेती उत्पादनाकडे वळले पाहिजे. आणि हे करण्यासाठीच या शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या शिबिराचे प्रमुख संयोजक शेतिनिष्ठ शेतकरी म्हणून अनेक पुरस्कार मिळविलेले वाडय़ातील शेतकरी अनिल पाटील यांनी दिली.
या शेतकरी शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंग यांच्यासोबत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण सावंत उपस्थित राहून ते जैविक विविधता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथील डॉ. प्रकाश इंगळे व ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक आर. एस. नाईकवाडी हे शेती विकासासाठी शासनाच्या योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ठाणे ग्रामीण जिल्ह्य़ातील अनेक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या या मार्गदर्शन शिबिरात मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जायंट्स ग्रुपचे सल्लागार मोहन पाटील यांनी केले आहे.