राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडी आणि खास करुन शिवसेनेची कोंडी करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना केल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाने रविवारी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. बोंडे यांना उमेदवारी देऊन भाजपाने राजकीय आरक्षण रद्द झाल्याने संतप्त भावना असलेल्या इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तिसरा उमेदवार भाजपाने दिल्याने अपक्ष उमेदवारांच्या जोरावर दुसरा उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भाजपाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविल्याने शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान असेल. 

नक्की वाचा >> “भाजपानेच संभाजीराजेंची कोंडी केली, राजे फडणवीसांना भेटले व पाठिंब्यासाठी…”; राज ठाकरेंचाही उल्लेख करत शिवसेनेचा हल्लाबोल

कोणाचा कार्यकाळ संपतोय?
भाजपाचे गोयल यांच्यासह डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे या तीन खासदार निवृत्त होत आहेत. गोयल यांना तिसऱ्यांदा राज्यसभेसाठी संधी देण्यात आली. सहस्त्रबुद्धे आणि डॉ. महात्मे यांना भाजपाने फेरउमेदवारी देण्यात आलेली नाही. यापैकी डॉ. सहस्त्रबुद्धे हे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आहेत. यामुळे नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांचे स्थान कायम राहिल.

बोंडेंच्या उमेदवारीचा अर्थ काय?
भाजपाने दुसऱ्या जागेसाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे माजी आमदार डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. बोंडे हे २००९ मध्ये अपक्ष तर २०१४ मध्ये भाजपाच्या वतीने विधानसभेवर निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजपाच्या कृषी विभागाचे ते अध्यक्ष आहेत. आक्रमक अशी प्रतिमा असलेले डॉ. बोंडे हे गेले दोन वर्षे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेहमी आक्रमकपणे बोलत असतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. कुणबी समाजातील डॉ. बोंडे यांना उमेदवारी देऊन भाजपाने ओबीसी समाजाचे कार्ड वापरले आहे.

नक्की वाचा >> आव्हाडांनी केली शाहू महाराज आणि शरद पवारांची तुलना; ‘बहुजनवाद विरुद्ध मनूवाद’ मथळ्याखालील पोस्टमध्ये म्हणाले, “सनातनी आणि…”

उमेदवारीचे कोल्हापूर कनेक्शन
तिसऱ्या जागेसाठी भाजपाने रात्री उशिरा कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली. कोल्हापूरचे संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. म्हणूनच भाजपानेही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना तिसरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे.  विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. भाजपाचे १०६ आमदार असून, पक्षाकडे २२ अतिरिक्त मते आहेत.

अपक्षांच्या जोरावर विजयाची आशा
आठ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून केला जातो. भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराला विजयाकरिता १२ मतांची आवश्यकता आहे. अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या मतांच्या आधारे मतांची जुळवाजुळव करण्यावर भाजपाचा भर आहे. भाजपाच्या तिसऱ्या उमेदवारामुळे शिवसेनेपुढे दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. कारण शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची सारी मदार ही स्वत: व राष्ट्रवादीची अतिरिक्त मते तसेच अपक्षांवर आहे. अपक्षांची मते भाजपाकडे गेल्यास शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचे भवितव्य कठीण असेल.

पटेल आज भरणार उमेदवारी अर्ज
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे राज्यसभा निवडणुकीकरिता सोमवारी दुपारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी जाहीर केले. या वेळी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री व नेतेमंडळी उपस्थित राहतील.

इतर राज्यांमधून महत्वाचे उमेदवार
राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पुन्हा कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ११ जागा रिक्त होत आहेत. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची मुदत संपुष्टात येत असली तरी रविवारी जाहीर झालेल्या यादीत नक्वी यांचा समावेश नाही. तसेच, सध्या राज्यसभेतील प्रतोद शिवप्रताप शुक्ल यांचेही नाव सहा उमेदवारांच्या यादीत नाही.