अशोक तुपे

अयोध्येतील नियोजित राम मंदिराचे प्राथमिक काम २० वर्षांपासून सुरू आहे. मंदिराकरिता लागणाऱ्या दगडी खांबांची घडण ८५ टक्के पूर्ण झाली आहे. येत्या दोन वर्षांत मंदिराचे काम पूर्ण केले जाईल, मंदिराकरिता देशातील विविध गावांतून जमा झालेल्या विटा या कारसेवकपुरम येथे सुरक्षित असून त्याचा वापर मंदिराकरिता केला जाणार असल्याची माहिती गोविंदगिरी महाराज यांनी ‘लोकसत्ता’ला खास मुलाखतीत दिली.

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केली आहे. या ट्रस्टमध्ये गोविंदगिरी महाराज यांचा समावेश आहे. गोविंदगिरी महाराज हे बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील आहेत.

प्रयागराजमध्ये येत्या पंधरा दिवसांत विश्वस्त मंडळाची पहिली बैठक होणार आहे. त्यानंतर लगेच कामाला सुरुवात होईल. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे राम मंदिर लढाईत मोठे योगदान आहे. त्यांनी आराखडा तयार करून घेतला होता. हा आराखडा आध्यात्मिक स्वरूपाचा असेल. अयोध्येत रामजन्मभूमी व रामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. त्यांचे दर्शन सुलभ व्हावे, असा आराखडा असेल. तसेच मंदिराच्या कामात भाविक योगदान देऊ  शकणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत गोविंदगिरी महाराज?

गोविंदगिरी महाराज यांचा जन्म बेलापूर येथे आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यास परिवारात झाला. किशोरजी व्यास हे त्यांचे मूळ नाव.

वेदमूर्ती डॉ. विश्वनाथ देव यांच्याकडे त्यांनी वेदाभ्यास केला. वाराणसी संस्कृत विद्यापीठात त्यांना आचार्य पदवी मिळाली. तेव्हापासून ते आचार्य किशोरजी व्यास या नावाने ओळखले जाऊ  लागले. हरिद्वार येथे त्यांनी स्वामी सत्यमित्रानंद यांच्या हस्ते संन्यास दीक्षा घेतली. त्यानंतर ते गोविंदगिरी महाराज झाले. गोविंदगिरी यांचे घराणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आहे.