अभिनेत्री पायल घोष हिने लावलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप सध्या चर्चेत आहे. पायल घोष हिने सोशल मीडियावर अनुराग कश्यपवर आरोप केले होते. माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे म्हणत पायलने मोदींकडे सुरक्षेची मागणीही केली आहे. पायल घोष आणि अनुराग कश्यप यांच्या वादात केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. पायल घोषने सिनेनिर्माता अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे.शिवाय पायलच्या आरोपांची दखल घेत मुंबई पोलिसांनी अनुरागला तात्काळ अटक करायला पाहिजे होते, असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवले यांनी ट्विट करत याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे.

अभिनेत्री पायल घोष यांनी सिनेनिर्माता अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. पायलच्या आरोपांची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होते. याप्रकरणी सीबीआय चौकशी होऊन पायल घोषला न्याय मिळवून दिला पाहिजे. रिपाइंचा पायल घोषला पाठिंबा राहिल, असं ट्विट आठवले यांनी केलं आहे.

तसेच अभिनेत्री पायल घोषसोबत दूरध्वनीवरून बोलणं झालं आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा राहील असे आश्वासन आठवले यांनी पायल घोष यांना दिले आहे.

पायल घोषचा आरोप काय?
“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप
“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बस इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.