एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पडले आहेत. या पक्षफुटीनंतर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यरोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनीदेखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. आज पुन्हा एकदा कदम यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले. तसेच शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टबद्दलची माहिती भाजपाला पुरविल्याच्या आरोपावरही त्यांनी भाष्य केले. अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्या यांना दिली नाही, असे रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगितले आहे.

हेही वाचा >> “मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी…”; उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची सुपारी दिल्याच्या नितेश राणेंच्या आरोपांवर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया

“किरीट सोमय्या यांना रिझवान काझी यांनी माहिती दिली होती. किरीट सोमय्या यांना सर्व माहिती मी दिली आहे, असे रिझवान काझी यांनी स्वत: सांगितलेले आहे. अनिल परब यांची माणसं मला हफ्ते मागत होते, म्हणून मी हे केले, असे काझी यांनी सांगितलेले आहे. मी तुळजाभवानी, बाळासाहेब ठाकरे तसेच माझ्या तीन मुलांची शपथ घेऊन सांगतो, की आजपर्यंत मी किरीट सोमय्या यांना कधीच बोललो नाही. हे सगळं कटकारस्थान अनिल परब यांनी केले,” असे कदम यांनी सांगितले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा >> “मला राज साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल” – अमित ठाकरेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण!

“मी माझ्या आयुष्यात कधीही खोटं बोललो नाही. असे केले असते तर मी सांगितले असते. मला कोणाची भीती आहे? मी कोणालाही घाबरत नाही. मी माझ्या उभ्या आयुष्यात कोणाचंही वाईट केलं नाही,” असेही रामदास कदम यांनी सांगितले.

हेही वाचा >> तुमच्या जीवाला धोका असताना उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर एकनाथ शिंदे म्हणाले…

“अनिल परब यांच्या रिसॉर्टबद्दलची माहिती मी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली असा आरोप माझ्यावर करण्यात आला. अनिल परब यांचे रिसॉर्ट ही काही शिवसेनेची मालमत्ता नाही. अनिल परब यांनी याआधी विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या एका आमदाराला तीन वेळा मातोश्रीवर आणले होते. याबाबतची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आहे. रामदास कदम यांना तिकीट न देता याच राष्ट्रवादीच्या आमदाराला तिकीट द्यावे, असा हट्ट परब यांचा होता. मात्र परब यांना ते जमले नाही. नंतर त्याच राष्ट्रवादीच्या आमदाराला शिवसेनेत आणायचे, आमदार करायचे आणि माझा मुलगा योगेशला संपवायचे असे कटकारस्थान सुरु होते,” असा आरोपही कदम यांनी केला.

हेही वाचा >> विश्लेषण : सामान्य सर्दी, पावसाळ्यात अ‍ॅलर्जीमुळे होणारा त्रास, की ओमायक्रॉनचा संसर्ग? समजून घ्या कसं ओळखावं

नेमके प्रकरण काय आहे?

रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती माजी मंत्री रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपांच्या पुष्टीसाठी कदम आणि सोमय्या यांच्यातील दूरभाष संवादाची ध्वनीफीतही यावेळी ऐकवण्यात आली होती. अनिल परब यांचे बांद्रा येथील कार्यालय तोडले जावे म्हणून केलेला आटापिटाही या ध्वनिफितीत ऐकायला मिळतो. माहिती अधिकार कार्यकर्ता प्रसाद कर्वे यांचाही या ध्वनिफितीत सहभाग असून अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांना सांगून मला मंत्रिमंडळात घेण्यापासून रोखले आहे, असे कदम यांचे प्रसाद कर्वे यांच्यासोबतचे कथित संभाषण त्या पत्रकार परिषदेत ऐकविण्यात आले होते. त्यानंतर रामदास कदम मातोश्रीपासून दुरावले होते.