scorecardresearch

नागभीड परिसरात दुर्मिळ ‘काळा गरुड’

मानवाच्या अमर्यादित हस्तक्षेपामुळे ‘काळा गरुड’ पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  

 चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी हा मोठा तलाव असून परिसरात अनेक डोंगररांगा आहेत. नैसर्गिक सृष्टीने नटलेल्या चिंधीचक जवळील किटाळी तलावाच्या पाळीवर हिमालयाच्या पर्वतरांगेत आढळणारा दुर्मिळ  ‘भारतीय काळा गरुड’ आढळून आला आहे. मानवाच्या अमर्यादित हस्तक्षेपामुळे ‘काळा गरुड’ पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  

 या परिसरात दरवर्षी दिवाळीनंतर  स्तलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते. मागील काही वर्षांपासून नागभीड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात कार्यरत पक्षीतज्ज्ञ व प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शास्त्रीय अभ्यास सुरू आहे. ९ जानेवारी २०२२ रोजी  पक्षीप्रेमी प्रा. निखिल बोरोडे, प्रा. अमोल रेवसकर व संजय सुरजुसे  पक्षीनिरीक्षणाला गेले असता  किटाळी तलावाच्या काठावरील झाडावर मोठ्या आकाराचा देखणा व रुबाबदार पक्षी  बसलेला दिसला. घरी आल्यावर त्याचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर तो  ‘भारतीय काळा गरुड’ असून त्याचे शास्त्रीय नाव ‘इक्टिनिट्स मलाइन्सिस’ असे असल्याचे कळले. हिमालय पर्वतरांगांमध्ये नैसर्गिक अधिवास असलेल्या या गरुड पक्षाच्या महाराष्ट्रात व भारतात अतिशय तुरळक नोंदी आहेत. हिवाळ्यात हिमालयाच्या पर्वतरांगांवर बर्फाचा जाड थर साचतो, भक्ष्य सापडत नाही. त्यामुळे हा पक्षी  खाद्याच्या शोधात राजस्थानच्या अरवली पर्वत रांगांमध्ये स्तलांतर करतो.  मैदानी प्रदेशात याची नोंद अभावानेच होते. हा गरुड संपूर्णत:  काळा असून, त्याची चोच तळाशी गडद पिवळ्या रंगाची असते. पाय गर्द पिवळ्या रंगाचे पायमोजे घातल्यासारखे दिसतात. भारतीय काळा गरुड शिकारी पक्षी असून, सरडे, साप, उंदीर, घुशी तर  वेळप्रसंगी इतर लहान पक्ष्यांची शिकारसुद्धा करतो. अशा शिकारी पक्ष्यांच्या संवर्धनाकरिता प्रशासनाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत पक्षीतज्ज्ञ डॉ. जी. डी. देशमुख यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rare black eagle in nagbhid area akp