गेल्या आठवडय़ात करोनाबाधितांचा उच्चांक गाठलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात गेले सलग तीन दिवस ही संख्या घटत असून सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात या रोगामुळे एकही मृत्यू झालेला नाही.जून—जुलै महिन्यात राज्यांमध्ये करोनाबाधित वाढत असताना रत्नागिरी जिल्ह्यात हे प्रमाण नियंत्रणात होते. पण या महिन्यात ते वाढायला लागले. काही वेळा तर २४ तासांच्या कालावधीत शंभरपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले. गेल्या २१ ऑगस्ट रोजी तर जिल्ह्य़ात एकाच दिवसात तब्बल १४५ करोनाबाधित रूग्ण नोंदले गेले. त्यामुळे काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पण दुसऱ्याच दिवसापासून ही संख्या घटू लागली. गेल्या शनिवारी ७०, रविवारी ६०, तर सोमवारी ३९ बाधित रूग्ण  निष्पन्न झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. यापैकी बहुसंख्य खेड (१७) आणि चिपळूण (१५) तालुक्यातील आहेत. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात एकाही करोनाबाधिताचा मृत्यू ओढवलेला नाही. उलट,  दिवसभरात ५६ रुग्ण करोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले.

गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील सकारात्मक रुग्णांची एकूण संख्या ३ हजार ४४४ झाली असून त्यापैकी एकूण २ हजार १७४ करोनामुक्त झाले आहेत, तर १ हजार १४९ रूग्ण सक्रीय सकारात्मक आहेत.

महसूल कर्मचारी करोनाबाधीत

सावंतवाडी, वेंगुर्ले व वैभववाडी तालुक्यातील महसूल कर्मचारी करोनाबाधीत आढळले आहेत त्यामुळे तहसीलदार कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील ८६ वर्षीय वृद्धाचा  करोनामुळे मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचाही आजार होता.  वृद्ध १५ ऑगस्टला करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या १६ झाली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ५२३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सोमवारी आणखी २५ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.