दिगंबर शिंदे

करोना महासाथ जगासाठी संकट ठरत असताना, बेदाणा उत्पादकांसाठी मात्र ती इष्टापत्ती ठरली आहे. करोनामुळे प्रतिकारक्षमता वाढीचा सगळीकडेच बोलबाला झाल्याने गेल्या चार महिन्यांत सांगलीच्या बाजारात तब्बल दीड लाख टन बेदाण्यांची विक्री झाली आहे. ही उलाढाल तब्बल दोन हजार कोटींची असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये विक्रमी पाचशे कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

करोनापासून बचाव करण्यासाठी शारीरिक प्रतिकारक्षमता प्रबळ ठरत असल्याचे संशोधन अहवाल समोर आल्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे, आयुर्वेदिक काढे, व्यायाम, समतोल आहार याच्या जोडीनेच पौष्टिक सुक्यामेव्याचाही सर्वत्र बोलबाला झाला. परिणामस्वरूप काही महिन्यांतच सुक्यामेव्याच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. यातही सुकामेव्याचे दर विचारात घेता अन्य घटकांच्या तुलनेत बेदाणा हा सर्वात स्वस्त आणि किफायतशीर असल्याने बाजारात त्याला मोठी पसंती मिळू लागली आहे.

सांगली, तासगाव ही बेदाण्याची देशातील प्रमुख बाजारपेठ आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या गेल्या चार महिन्यांत या दोन्ही बाजारपेठांमधून मिळून तब्बल दीड लाख टन बेदाण्याची देश-विदेशात विक्री झाली आहे. साधारण वर्षभरात होणारी ही विक्री केवळ या चार महिन्यांतच झाली आहे. ही उलाढाल तब्बल दोन हजार कोटींची असून मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये विक्रमी पाचशे कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यंदा अद्याप ५० हजार टन माल या दोन्ही ठिकाणी शिल्लक असून करोना, दिवाळी आणि थंडीच्या हंगामाचा विचार करता हा मालही लवकरच संपण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बेदाण्याच्या या वाढत्या मागणीमुळे त्याच्या दरातही यंदा वाढ झाली असून प्रतवारीनुसार ८० ते २०० रुपये किलोचा हा दर १०० ते २६५ रुपयांवर गेला आहे.

द्राक्षात बुडालेले बेदाण्यात वाचले

द्राक्ष हंगामाच्या अखेरच्या काळातच मार्चमध्ये टाळेबंदी जाहीर झाली. यामुळे देशाच्या बाजारपेठेत जाणारा माल बागेतच राहिला. द्राक्ष हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांनी तो बेदाणानिर्मितीकडे वळवला. दरवर्षी सांगली, तासगाव परिसरांत दीड लाख टन बेदाणा उत्पादन होत असते आणि याची विक्री पुढील वर्षभरात होते. मात्र यंदा द्राक्षविक्रीअभावी बेदाण्याचे हे उत्पादन दोन लाख टनांवर गेले आहे. तर यातील दीड लाख बेदाणा केवळ या चार महिन्यांतच विकला गेला आहे.

तासगाव बेदाण्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने आणि ती रसाळ असल्याने देशपातळीवर मोठी मागणी असते. करोनाविरुद्धच्या लढाईत प्रतिकारशक्तीच्या चर्चेमुळे या मागणीत यंदा मोठी वाढ झाली आहे. याचा फायदा बेदाणा उत्पादकांना होणार आहे.

– सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली