पश्चिम विदर्भात भारिप-बहुजन महासंघाला आपल्या प्रभावक्षेत्रांमध्ये जनाधार टिकवून ठेवण्यात यश मिळाले असले, तरी रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे बसपाने सहा मतदारसंघांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांसोबत टक्कर देत तिसऱ्या, चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. बदलत्या राजकीय प्रवाहाचे ते संकेत ठरले आहेत. बसपने एकही जागा जिंकली नसली, तरी पश्चिम विदर्भातील तीस विधानसभा मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये निकालावर परिणाम आणि प्रभाव पाडला आहे.
धामणगाव रेल्वे मतदारसंघात बसपने भाजप आणि काँग्रेस या थेट लढतीत तिसरा कोन आणला आणि तब्बल २९ हजार मतांची कमाई केली. अमरावतीतही काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षांदरम्यान बसपने ११ हजारांवर मते मिळवून तिसरे स्थान पटकावले. अचलपूरमध्ये बसपने दिग्गज उमेदवारांच्या गर्दीत २० हजारांवर मते खेचून चौथ्या स्थानी झेप घेतली. यवतमाळ आणि तिवसामध्ये बसपला चौथे स्थान मिळाले. बसपने गेल्या दोन दशकांमध्ये आपला जनाधार वाढवला आहे. काही ठिकाणी तर बसपला प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. पश्चिम विदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बमसंचा काही मतदारसंघांमध्ये प्रभाव आहे.
गेल्या निवडणुकीत भारिप-बमसंला दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना एकाच जागेवर समाधान मानावे लागले, पण अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यांमधील आठ मतदारसंघांमध्ये भारिप-बमसंचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी आहेत.
बाळापूरमधून तर भारिप-बमसंला विजय मिळाला. खामगाव, जळगाव जामोद, अकोट, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर, रिसोड, वाशीम, कारंजा या मतदारसंघांमध्ये भारिप-बमसंने चांगली मते खेचली आहेत. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात मात्र भारिप-बमसंला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटासोबत भारिप-बमसंची युती होईल, अशी शक्यता होती, पण हे गट वेगवेगळे लढले.
रिपाइं गवई गटाला दर्यापूर वगळता इतर कोणत्याही ठिकाणी चांगली कामगिरी दाखवता आली नाही. दर्यापूरमध्ये रिपाइंचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, हे केवळ समाधान त्यांच्यासाठी पुरेसे आहे. अमरावती जिल्हा वगळता इतर ठिकाणी गवई गटाचे अस्तित्व नगण्य आहे. प्रकाश आंबेडकरांना अनेक मतदारसंघात काही प्रमाणात पाठिंबा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दूर सारल्याने रिपाइं गवई गटाची चांगलीच अडचण झाली आहे. पश्चिम विदर्भातील अनेक मतदारसंघांमध्ये रिपब्लिकन पक्षांकडे निवडणुकीची समीकरणे बदलण्याची ताकद आहे. भारिप-बमसंने तर निवडणूक जिंकण्याची किमया दाखवून दिली आहे. मात्र, बसपने रिपब्लिकन पक्षांचा जनाधार पोखरण्यास सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पक्षांची आपापली प्रभावक्षेत्रे असली, तरी जनाधाराच्या स्वाभाविक मर्यादाही आहेत. त्यामुळे या पक्षांचे अस्तित्वही नष्ट होत नाही आणि एका मर्यादेपेक्षा जास्त वाढूही शकत नाही, हे या निकालांनी दाखवून दिले आहे.