मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुराव्यासह योग्य बाजू मांडून विधिमंडळात विधेयक संमत करून समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा माजी खासदार शिवाजी माने यांनी दिला.
मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा आरक्षण बचाव समितीच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. पोलिसांनी प्रवेशद्वारावर मोर्चा अडवला. या ठिकाणी झालेल्या सभेत माने बोलत होते. आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिपचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील, खंडेराव सरनाईक, मुनीर पटेल, जक्की कुरेशी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, मनोज आखरे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
माने म्हणाले, की मराठा आरक्षणाला आघाडी सरकारने मंजुरी दिली होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे न्यायालयात स्थगिती मिळाल्याने राज्य सरकारने आता पुराव्यासह योग्य बाजू मांडून विधिमंडळात विधेयक संमत करावे व मराठा व मुस्लीम समाजाला त्यांच्या न्यायासाठी आरक्षण मिळवून द्यावे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी करून आरक्षण न मिळाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माने यांनी दिला. आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिला. मराठा आरक्षण बचाव समितीच्या प्रमुखांचे शिष्टमंडळ जिल्हा प्रशासनाला भेटले व निवेदन दिले.