पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे हे पेट्रोल-डिझेल जर फुकटात मिळाले तर… अशी स्वप्न पाहणाऱ्या अनेकांपैकी काहींना याचा प्रत्यय आज आला. रविवारी, २८ फेब्रुवारीला मध्यरात्री येथील पांढरकवडा मार्गावर डिझेलची वाहतूक करणारा भरधाव टँकर उलटला. परिसरात ही वार्ता कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मिळेल त्या भांड्यात डिझेल पळविण्याचा सपाटा लावला. चालक, वाहकाच्या डोळ्यादेखत रात्रीतून तब्बल ३० हजार लिटर डिझेल गायब झाल्याची चर्चा आहे.

राजस्थान येथून टँकर (क्र. जीजे १२ बीएक्स ३९६९ ) हे चंद्रपूरकडे डिझेल घेऊन निघाले होते. त्यात ३० हजार लिटर डिझेल होते. दरम्यान, चालकाचे भरधाव टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे टँकर रस्त्याच्याकडेला उलटला. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही. मात्र टँकर चालक गणेश मंगारा आणि वाहक धर्मेंद्र ईशाराम दोघेही (रा. राजस्थान) किरकोळ जखमी झाले.

तर, टँकर उलटल्याची माहिती मिळताच आसपासच्या खेड्यातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी मिळेल त्या साहित्याद्वारे टँकरमधून डिझेल पळविण्याचा सपाटा चालविला. या घटनेची माहिती रात्रीच यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली होती. मात्र पोलीस पथक सोमवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीतून टँकरमधील ३० हजार लिटर डिझेल गायब झाल्याची चर्चा आहे. या डिझेल चोरी किंवा अपघात प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी दिली.