दिगंबर शिंदे

पक्षासाठी काम करणाऱ्यांना पक्षशिस्तीचे धडे देत भाजपच्या नेतृत्वाने बंडाची भाषा करणाऱ्यांना महापौर, उपमहापौर पदाची उमेदवारी देत संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न केला आहे. या पदांसाठी शुक्रवारी दि. ७ रोजी निवडणूक होत आहे. तरीही महापालिकेची एकहाती सत्ता टिकवणे दिवसेंदिवस कठीण बनत चालल्याचेच चित्र आहे. विशेषत राज्यातील सत्ताबदलानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये महापालिकेत आयारामांच्या जीवावर सत्ता संपादन केलेल्या भाजपसाठी भविष्यातील वाटचाल दुहीची बीजे पेरणारी ठरली नाही तरच नवल.

भाजपने अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देत  ४१ जागा जिंकून सांगली महापालिकेत एकहाती सत्ता संपादन केली. भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून जनता दलातून आलेल्या संगीता खोत यांना संधी देत असतानाच सव्वा वर्षांचा कार्यकाल पक्षाच्या सुकाणू समितीने निश्चित केला होता. मात्र मुदत संपल्यानंतरही त्यांनी राजीनामा देण्यास खळखळ केली. अगदी प्रजासत्ताक दिनाचे  ध्वजवंदन करण्यापर्यंत मुदत देण्यास नकार देत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा देण्यास सांगितले. प्रजासत्ताक दिन अवघ्या सहा दिवसांवर आला असताना महासभेत राजीनामा देण्याचे निर्देश दिले.

यानंतर महापौर, उपमहापौर निवडीसाठी हालचाली गतीमान झाल्या. महापौर पद हे अद्याप एक वर्ष इतर मागासवर्गीय गटातील महिलांसाठी राखीव आहे. यामुळे पक्षातील सात महिला या पदासाठी पुढे सरसावल्या. तर उपमहापौर पदासाठी पाच जण इच्छुक होते. अखेरच्या क्षणी महापौर पदासाठी गीता सुतार यांना संधी देत मूळच्या भाजपवासीय असलेल्या सविता मदने आणि उर्मिला बेलवलकर यांचा हक्क डावलण्यात आला. पक्षाच्या सुकाणू समितीसमोर या इच्छुकांना का डावलण्यात आले याचे उत्तरही समितीतील जेष्ठ मंडळींना देता आले नाही. ज्यांच्यावर चंद्रकांतदादांनी महापालिकेची जबाबदारी सोपवून स्वीकृत सदस्य पदावर नियुक्ती केली त्या प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनाही या निर्णयापासून अलिप्त ठेवले. त्यांनी मदने यांच्या नावाचा आग्रह धरला होता. उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना त्यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जाणारी ठरली.

यापूर्वी महापालिकेत विकास आघाडीकडे सांगलीकरांनी सत्ता सोपवली होती. त्यावेळी भाजपवासीय परंतु सत्तेसाठी जेजीपी म्हणजे जयंत जनता पार्टीत सहभागी झालेल्यांना सत्तेत वाटा मिळाला होता. इनामदार उपमहापौर तर मकरंद देशपांडे स्थायी समिती सभापती झाले होते. परंतु विकास महाआघाडीतील मतभेद शेवटच्या दोन वर्षांत टोकाला गेल्याने या महाआघाडीचे बारा वाजले होते. आता हेच सत्तेचे आणि डोक्यांचा खेळ करणारे भाजपमध्ये आहेत. यामुळे जरी आज उमेदवार निवडीवेळी भाजपमध्ये एकमत असल्याचे दाखविण्यात येत असले तरी अंतर्गत खळबळ मोठी आहे हे मान्यच करावे लागेल.

उपमहापौर पदासाठी एका आमदारांनी निष्ठावंत सदस्याचा आग्रह धरला होता.  मात्र त्यांची समजूत काढून आनंदा देवमाने यांना संधी देण्यात आली. ज्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षाचा प्रचार केल्याचा वहिम आहे. तर भाजप उमेदवाराविरुद्ध पत्नीची उमेदवारीही दाखल करण्याची तयारी केली होती. त्यांनाच उपमहापौर पदाची संधी देण्यात आली आहे. यामागेही मिरजेत असलेल्या आणि सुकाणू समितीत असलेल्या आवटी गटाचा मोलाचा सहभाग आहे हे लपून राहिलेले नाही.

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समिती सदस्य निवडीवेळीही अशीच गटबाजी उफाळून आली  होती. त्यावेळी पांडुरंग कोरे यांची उमेदवारी डावलून चच्रेत नसलेल्या मोहना ठाणेदार या महिलेला संधी देण्यात आली. स्थायी सभापती निवडीवेळी आम्ही म्हणू तसा निर्णय झाला नाही तर वेगळा विचार केला जाईल असा इशारा आवटी गटाच्या सदस्यांनी दिल्याने अखेर संदीप आवटी यांना संधी देउन भाजपने बंडाळी शमविण्याचे यशस्वी प्रयत्न केले होते.

भाजप पदाधिकारी निवडीवेळी संख्याबळ सिद्ध करेलही, मात्र आज असंघटित असलेला विरोध भविष्यामध्ये संघटित झाला तर भाजपला महापालिकेतील सत्ता राबविणे कठीण ठरवेल. लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत आहे असे चित्र शहरात कुठे दिसत आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यात राज्यातील सत्ता बदलाचे परिणाम निधी मिळण्यावर झाला तर ओढूनताणून संख्याबळ कब्जात राखणाऱ्या सत्ता राखून जनमतही कायम राखणे जिकिरीचे ठरणार आहे.

पालिकेतील संख्याबळ

महापौर व उपमहापौर निवडीसाठी उद्या सात फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भाजपकडून महापौर पदासाठी गीता सुतार आणि उपमहापौर पदासाठी आनंदा देवमाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून महापौरपदासाठी मालन हुलवान, वर्षां निंबाळकर आणि उपमहापौर पदासाठी मनोज सरगर व योगेंद्र थोरात यांनी उमेदवारी दाखल केली आहे. महापालिकेत भाजपचे संख्याबळ ४१ आणि दोन अपक्ष असे ४३ आहे तर आघाडीचे संख्याबळ काँग्रेस २० आणि राष्ट्रवादीचे १५ असे ३५ आहे.

महापौर, उपमहापौर हे भाजपचेच होतील, यात तिळमात्र शंका नाही. पदासाठी इच्छुक असणे यामध्ये गर काहीच नाही. मात्र एखाद्यालाच संधी देता येते. इच्छुकांना यापेक्षा वेगळी जबाबदारी देण्यात येईल.

–  शेखर इनामदार, नगरसेवक व प्रदेश उपाध्यक्ष भाजप.

महापालिकेत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे पर्व पुन्हा सुरू करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी प्रयत्नशील असून भाजपमधील काही नाराज आमच्या संपर्कात आहेत. यामुळे महापौर, उपमहापौर निवडीवेळी चमत्कार दिसेल

– कमलाकर पाटील, विधानसभा क्षेत्राध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.