भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शिराळ्यामध्ये शनिवारी ९९ फूट लांब व ६६ फूट रूंदीचा तिरंगा फडकावून मानवंदना दिली. ‘हर घर तिरंगा’ जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी आज रॅली काढली होती. रिमझिम पावसात तीन हजार विद्यार्थीं या रॅलीत सहभागी झाले होते.

देशाप्रती आपली निष्ठा व आस्था प्रदर्शित करीत भव्यदिव्य राष्ट्रध्वज फडकावण्याचा सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम शिराळा नगरपंचायतीने आज राबविला. शिराळा येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी तहसिलदार गणेश शिंदे, नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, पोलिस निरीक्षक सुरेश चिावार यांच्यासह शाळकरी विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

जवळपा तीन हजार विद्यार्थ्यांच्या घोषणा –

या उपक्रमाच्या सुरुवातीला शिराळा शहरातील न्यू इंग्लिश स्कुल, कन्या शाळा, श्री शिव छत्रपती विद्यालय, विश्वासराव नाईक व बाबा नाईक महाविद्यालय, भारतीय विद्यानिकेतन, यशवंत बालक मंदिर, सदगुरु प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, उर्दु शाळा , जिल्हा परिषद शाळा, शिराळा तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सहभागाने शहरातील प्रमुख मार्गावरुन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा अभियानाची जनजागृती करत सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या गजरात जगजागृती रॅली काढण्यात आली.

राष्ट्रगीताच्या गजरात सलामी –

रॅलीचा समारोप श्री शिवछत्रपती विद्यालय मैदानात करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या ९९ फुट लांबीचा व ६६ फूट रुंदी असलेला भव्य तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांच्या शिरावरून रिमझिम पावसात डौलात व तेवढ्याच अभिमानात फडकविण्यात आला. या फडकलेल्या राष्ट्रध्वजाला उपस्थित सर्वांनीच राष्ट्रगीताच्या गजरात सलामी देऊन मानवंदना दिली.