सांगली महापालिकेच्या निकालातून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांची पत दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी सोईनुसार शिवसेना व भाजपशी संबंध ठेवते. राष्ट्रवादीमध्ये थोडीफार नैतिकता शिल्लक असेल तर या निकालावरून त्यांनी बोध घ्यावा, अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी श्यौराज वाल्मीकी यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर थेट हल्ला चढविला. भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांची काँग्रेस प्रभारींनी ‘मौत का सौदागर’ आणि ‘झुठों का सरदार’ अशा शब्दांत निर्भर्त्सना केली. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमत मिळवून राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.
शहर काँग्रेसतर्फे गुरुवारी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वाल्मीकी यांनी राष्ट्रवादीसह नरेंद्र मोदींवर अतिशय तिखट शब्दांत टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे अनेकांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील त्यास अपवाद नाहीत. काँग्रेस नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे सांगलीतील निकालाने दाखवून दिले. केंद्र सरकारमध्ये आमच्या मित्रपक्षाचे शरद पवार हे अतिशय मोठे नेते आहेत. परंतु, पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजप व सेनेशी संबंध ठेवले असल्याची आपली माहिती आहे. राष्ट्रवादीशी आघाडी करू नये, अशी राज्यातील काँग्रेसजनांची भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविली जाईल, असेही ते म्हणाले.
गुजरातमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नरेंद्र मोदींनाही पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. उत्तराखंडमधील जलप्रपातानंतर मोदींनी हेलिकॉप्टरद्वारे दौरा करून १५ हजार गुजराती बांधवांची हवाईमार्गे सुटका केल्याचा दावा केला होता. परंतु अवघ्या काही तासांच्या दौऱ्यात हेलिकॉप्टरद्वारे इतके नागरिक कसे जाऊ शकतात, असा प्रश्न वाल्मीकी यांनी उपस्थित करीत मोदींच्या खोटारडेपणाचा हा कळस असल्याचे नमूद केले. भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा मांडला जातो. पण तारीख कधी जाहीर केली जात नाही. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करून मतांचे राजकारण भाजपकडून केले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज झाली असून राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.