शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडून येऊन दाखवा. तुम्ही कितीही खोके वाटले तरी इथला एकही शिवसैनिक विकला जाणार नाही, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं. आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खोचक सल्ला दिला आहे. आदित्य ठाकरेंचं वय ३२ वर्षे झालं आहे, त्यांचं लग्नाचं वय उलटून गेलं आहे. त्यांनी चांगली पोरगी बघून लग्न करावं. चांगला संसार करावा, विनाकारण आपल्या औकातीपेक्षा जास्त बोलू नये, अशी टीका संजय गायकवाडांनी केली. हेही वाचा- “…म्हणून माझा संताप झाला”, सत्यजित तांबेंनी सांगितलं बंडखोरीचं पडद्यामागचं कारण यावेळी संजय गायकवाड म्हणाले, "आदित्य ठाकरेंनी आपली कुवत पाहून… ताकद पाहून… आपण कुणाला आव्हान देतोय? हे पाहावं. राज्यातील प्रश्न सोडवण्याचं, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याचं, राज्याला सिंचन प्रकल्प देण्याचं, राज्यात उद्योगधंदे आणून बेरोजगारांना रोजगार द्यायचं, अशी आव्हानं एकनाथ शिंदेंनी स्वीकारली आहेत. ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. ते अशा कुठल्याही टीकेला कामातून उत्तर देतात." हेही वाचा- “आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील…”, शिंदे गटाच्या नेत्याचा खोचक टीका! संजय गायकवाड पुढे म्हणाले, "संजय राऊत म्हणत असतील की, ३२ वर्षाच्या पोरानं आव्हान दिलंय. तर मला वाटतं की, ३२ वर्षे हे लग्नासाठीचं उलटून गेलेलं वय आहे. त्यामुळे त्यांना सल्ला आहे की, त्यांनी चांगली पोरगी बघून लग्न करावं. चांगला संसार करावा. विनाकारण आपल्या औकातीपेक्षा जास्त बोलू नये." "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या मतदारसंघात पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे," असा पलटवारही बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.