शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्यावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. मात्र शिवसेना नेतेही मैदानात उतरले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे मेळाव्यांमधून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केले आहे. शिवसेनेतर्फे दहिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होत.

“मला आता प्रश्न पडला आहे की किरीट सोमय्या काय करणार? ते आता बेरोजगार झाले आहेत. अनेक दिवस किरीट सोमय्या प्रताप सरनाईकांच्या मागे लागले होते. एक दिवस प्रताप सरनाईकांचा मला फोन आला आणि म्हणाले की मला दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस भेटले. ते मला अमित शाह यांच्याकडे घेऊन गेले आणि माझी ईडीचे प्रकरण साफ झाले. त्यामुळे मी सुरतला जात आहे. अशी कोणती वॉशिंग मशीन होती की हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण स्वच्छ झाले. सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी दिल्लीला गेले आणि त्यांना वॉशिंग मशिनमध्ये टाकले. त्यानंतर ते साफ झाले,” असे संजय राऊत म्हणाले.

“ईडीची कारवाई माझ्यावर पण झाली. माझी जमीन कारण नसताना जप्त केली. पण आम्ही गुढघे नाही टेकले. ज्या दिवशी माझ्या घरी धाड पडली तेव्हा मी दिल्लीला होता. १२ वाजता अमित शाह यांना फोन करुन सांगितले की हिंमत असेल तर मला अटक करा. मी बाळासाहेब ठाकरे गटाचे नाव सांगत नाही. माझं शरीर वाघाचं आणि काळीज उदराचे नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांची टीका

दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही सरकारवर टीका केली आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. “आम्हाला धमक्या देत आहेत. हे माफिया सरकार आणि त्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रवक्ते किरीट सोमय्याला धमक्या देत आहेत. मी उद्धव ठाकरेंना निरोप देतो. उद्धव ठाकरे साहेब, आपण मला तोतरा म्हणा, बोबड्या म्हणा, टमरेल म्हणा. आपले प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना भ** म्हणावं, चु** म्हणावं. पण हिशोब तर द्यावाच लागणार. उद्धव ठाकरे साहेब, १९ बंगल्यांचा हिशोब घेतल्याशिवाय किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही”, असे किरीट सोमय्या म्हणाले.