राज्यातील व देशातील प्रश्नांसंदर्भात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून, संजय राऊत यांनी मुलाखतीसंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांची मुलाखत घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच या मुलाखतीत पवारांनी कोणत्या विषयावर भाष्य केलं आहे, याचीही माहिती दिली.

आणखी वाचा- अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकास आघाडीच्या डिक्शनरीत नाहीत, राऊतांचं फडणवीसांना उत्तर

संजय राऊत म्हणाले, “शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं अगोदरच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभरपेक्षा अधिक मुलाखत घेतल्या आहेत. पहिल्यांदाच सामनासाठी घेतलेली ही पहिलीच मुलाखत आहे. लोकांना पाहिलेले पवार वेगळे आहेत, मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज, बदनामीकारक विधान कायम केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटल होतं की, शरद पवार सरकार बनवतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,” असं राऊत म्हणाले.

आणखी वाचा- १२ आमदारांचं प्रकरण नेमकं काय? काय आहे त्यामागे राजकारण? संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

“शरद पवारांची मुलाखत शनिवारपासून प्रसिद्ध होईल. अशी मुलाखत होणे नाही, एवढंच मी म्हणेल. तीन भागात ही मुलाखत येईल. इतकी प्रदीर्घ मुलाखत शरद पवारांनी कधी दिली नसेल असं मला वाटतं. शरद पवार यांनी या मुलाखतीत त्यांच्याविषयीच्या राज्य, देशाविषयीच्या प्रश्नांना स्पर्श केला आहे. मोकळेपणानं उत्तर दिली आहेत. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. त्यांच्याशी खासगीत बोलणं वेगळं. त्यांच्याकडे जे माहितीचं भांडार आहे, देशातील लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे. आज देशामध्ये त्यांच्या उंचीचा नेता मला दिसत नाही. पन्नास वर्षांपेक्षा जास्त त्यांची संसदीय कारकीर्द आहे. ती अंजिक्य आहे. असा हा नेता महाराष्ट्राचा. त्याचे राजकारणासंदर्भात आडाखे आहेत. राज्यातील सरकारविषयी चर्चा झाली. त्यांच्या लॉकडाउनच्या काळाविषयी, त्यांनी लॉकडाउनचा काळ कसा व्यथित केला, त्यासंदर्भातही बोललो आहे. मुख्य म्हणजे देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्याचा जो चीनशी संवाद त्या काळात होता. चीनचा प्रश्न त्यांनी कशाप्रकारे हाताळला? आणि त्यांचा जो चीनला मुक्काम होता त्या काळातला. त्यावेळी ते काही काळ चीनला होते. त्यांनी काही करार केले महत्त्वाचे, त्याच करारांचं आज पालन होतंय. गोळी चालवायची नाही, हे त्यांच्या काळातील करार आहे. हे लोकांना माहिती नाही. ही मुलाखत ऐतिहासिक ठरेल असं मला वाटत आणि ती मी घेतलीय म्हणजे ऐतिहासिकच आहे,” असं राऊत म्हणाले.