‘नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाहीत, तर…’; संजय राऊतांनी राणेंना काढला चिमटा

अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी राणेंची ओळख शिवसैनिक असल्याचं सांगत चिमटा काढला

sanjay raut, narayan rane, shivsena, bjp, shivsainik, maharashtra
अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी राणेंची ओळख शिवसैनिक असल्याचं सांगत चिमटा काढला आहे.

राज्यात ओढवलेल्या महापुरानंतर नारायण राणे यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे केले. या दौऱ्यांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राणे यांच्याकडून झालेल्या टीकेवरून आता शिवसेनेचे संजय राऊत यांनी राणेंवर प्रहार केला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी राणेंची ओळख शिवसैनिक असल्याचं सांगत चिमटा काढला आहे. ‘शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला, तरी त्याची ओळख शिवसैनिकच असते. त्यात बदल होत नाही’, असं म्हणत संजय राऊत यांनी राणेंना टोला लगावला.

अहमदनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे विधान केलं. “सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देऊ शकतो. गडचिरोलीला पाठवू का? असा दम देऊ शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतात. शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखं जन्माला आलो, वाघासारखं मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या”, असं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

“संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कुणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखलं जातं. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं. तुम्ही कुठंही जा, लोक तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही. सत्ता हा मानसिक आधार आहे. “, असं म्हणत राऊत यांनी नारायण राणे यांना चिमटा काढला.

राऊत यांनी फडणवीसांचा नामोल्लेख टाळत निशाणा साधला. ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा पुन्हा येईन… जोपर्यंत शिवसेनेचा ‌झेंडा तोपर्यंत पुन्हा पुन्हा येईन…”, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला. ‘दिल्लीच्या‌ तक्तावरही भगवा फडकवू. हारलेल्या जागा पुन्हा जिंकायच्या आहेत. तिच खरी बाळासाहेबांना मानवंदना राहिल, असं ते शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay raut taunt union minister narayan rane maharashtra politics bjp shiv sena bmh