पर्यटन महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे लोकांना विविध कला पाहावयास मिळतात. या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी स्थानिक नागरिकांसह शेकडो देशी तसेच विदेशी पर्यटक येत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रेलचेलीमुळे सांस्कृतिक परंपरेचे जतन होऊन एकमेकातील आदरभाव वाढवण्यास मदत होते. मुरुड येथील पर्यटन महोत्सवामुळे हे निश्चितच साध्य करता आले आहे. म्हणून अशा पर्यटन महोत्सवाला राज्य शासन कदापि निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री ना. सुनील तटकरे यांनी मुरुड येथे केले. त्यांच्या शुभ हस्ते मुरुड पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व श्वेत फुगे सोडून करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार मधुशेठ ठाकूर, नगराध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक, तालुका अध्यक्ष भरत बेलोसे, उपनगराध्यक्ष रश्मी कांबळे, प्रताप गंभीर, शहर अध्यक्ष हसमुख जैन, कार्याध्यक्ष अजित गुरव, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, बांधकाम सभापती प्रशांत नाईक, संजय गुंजाल, विरोधी पक्षनेत्या मुग्धा जोशी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, अतिक खतिब, मुख्याधिकारी जगताप, गटनेते महेश भगत, चिटणीस स्मिता खेडेकर, सर्व नगरसेवक व मान्यवर या वेळी उपस्थित होते. या वेळी तटकरे आपल्या भाषणात म्हणाले की, सन २०१३ला मुरुड नगरपरिषदेस १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा शतकोत्तर महोत्सव साजरा करताना विविध कला व क्रीडा कार्यक्रम राबवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून भरघोस निधी प्राप्त करून दिला जाईल. कोकणातील प्रतिबिंब जपण्याचे महत्त्वपूर्ण योगदान या महोत्सवामुळे होत आहे. राजकारणात खेकडे वृत्ती असतेच पण त्यावर आपल्या बुद्धिकौशल्याने मात करावयाची असते. मी हे पार केलेले आहे, त्यामुळे खेकडे वृत्तीचा विचारच करू नये. कोकणाला ७२० कि.मी.चा नागरी किनारा लाभला आहे. हे वैभव पर्यटन महोत्सवात दाखवून पर्यटनाची संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करेन. शतकोत्तर महोत्सव जगासमोर आदर्शवत असाच ठरेल यासाठी शहरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन या वेळी त्यांनी केले. या वेळी नगराध्यक्षा कल्पना पाटील आपल्या प्रस्ताविक भाषणात म्हणाल्या की, शहरातील विकासासाठी निधी व शतकोत्तर महोत्सवासाठी विशेष लक्ष देण्याची मागणी केली. शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर आपल्या भाषणात म्हणाले की, पर्यटन महोत्सवास आर्थिक नियोजन हे महत्त्वाचे असते. पद्मदुर्ग किल्ला लोकांना पाहावयास मिळाला पाहिजे यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली. या वेळी ना. तटकरे यांच्या हस्ते नाटय़ व दिग्दर्शन क्षेत्रात प्रावीण्य असलेल्या अजित भगत, सतीश सल्लागरे, जितेंद्र भायदे, अभय पैर, प्रशांत गुरव, विजय सुर्वे, विजय खातू आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षणाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून त्यांच्याच हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे तर आभार अजित गुरव यांनी मानले.