कराड :  बिअर बारला परवानगी दिल्याने चिडून जाऊन ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवकाला मारहाण झाल्याचा प्रकार कराड तालुक्यातील धावरवाडीच्या ग्रामसभेत घडला. याप्रकरणी परस्परविरोधी तीन फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

ग्रामसभेतील राडय़ामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. उंब्रज पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे. दारू दुकानाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत सचिन शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीसह नानासो शेळके, संजय चंदुगडे, महेश चंदुगडे, विलास शेळके, कृष्णात चंदुगडे, राहुल कदम, नीलेश शेळके, संभाजी शेळके यांनी गावचे सरपंच महेश सुतार यांना ऐनवेळेच्या विषयांमध्ये तुम्ही मागील ठरावामध्ये बियर बारला मान्यता का दिली? असा जाब विचारत सरपंच सुतार तसेच श्रीकांत चव्हाण, प्रज्वल चव्हाण, शंकर चंदुगडे, सागर चव्हाण, दादासो चंदुगडे हे अंगावर धाऊन आले व शिवीगाळ करून यातील एकाने लाकडाने मारहाण केली. यावरून सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सरपंच सुतारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्रामसभेवेळी संजय चंदुगडे, सचिन शेळके, महेश चंदुगडे, विलास शेळके, कृष्णात चंदुगडे, नीलेश शेळके, राहुल कदम, नानासो शेळके यांनी मागील ग्रामसभेत तुम्ही निखिल साळुंखेला बिअर बारची परवानगी कशी काय दिली असे म्हणून संजय चंदुगडेने फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली.

श्रीकांत चव्हाण व त्यांची दोन मुले प्रज्वल व सागरला सचिन शेळकेने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामसेवक विजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्रामसभेत सचिन शेळकेने ऐनवेळेच्या विषयांमध्ये सरपंच सुतार यांना तुम्ही मागील ग्रामसभेच्या ठरावामध्ये बिअर बारला परवानगी कशी काय दिली असे विचारले असता सरपंच सुतार व सचिन शेळके ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची होऊन त्यानंतर मारामारी झाली. ग्रामसभेचे विनापरवाना व्हिडिओ शूटिंग झाल्याचीही तक्रार आहे. यावेळच्या धक्काबुक्की, हाणामारीत ग्रामपंचायतीच्या इंटरनेटच्या साहित्याची मोडतोड झाली व सरकारी कामात अडथळा आणल्याचीही तक्रार आहे.

यावेळच्या धक्काबुक्की, हाणामारीत ग्रामपंचायतीच्या इंटरनेटच्या साहित्याची मोडतोड झाली व सरकारी कामात अडथळा आणल्याचीही तक्रार आहे.