वाई: किल्ले अजिंक्यताऱ्यावर मोरांच्या अधिवासात नारिकांनी अतिक्रमण केल्याने हा अधिवासच धोक्यात आला आहे. मांणसाळलेला मोर लोकांसमोर तासनतास पिसारा फुलवून नाचतो. सकाळी लोकांना फोटो काढण्यास शूटिंग करण्यास व आपल्यासोबत सेल्फी घेण्यास आपल्या नैसर्गिक रूपाचे दर्शन देतो. अशी छायाचित्रे समाज माध्यमावर आल्यानंतर अजिक्यताऱ्यावर सकाळी फिरावयास येणाऱ्यांनी एकच गर्दी केली. यामुळे या वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिल्याने साताऱ्यातील निसर्ग प्रेमींनी नाराजी व्यक्त केली. त्यांना त्यांच्या अधिवासात राहू द्या नागरिकांनी लांबून त्याचा आनंद घ्यावा. मात्र त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण करू नका, अशी विनंती पक्षी व वन्य प्रेमींनी केली आहे.

सातारा शहरात किल्ले अजिंक्यतारा,ओढ्याची मान व खिंडवाडी या भागात मोठ्या प्रमाणात मोरांचा रहिवास आहे. सातारा निसर्ग संपन्न म्हणूनही परिचित आहे. किल्ले अजिंक्यतारा, यवतेश्वर डोंगरमाथा व घाट, कास परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. याला जोडून पालिका शहरात उद्याने विकसित करत आहे. मात्र या परिसरात मोरांचा वावर असणाऱ्या परिसरात नागरिकांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे येथील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे.

हेही वाचा – अनिल देशमुख यांचं मोठं विधान; म्हणाले, “जसंजशी विधानसभा जवळ येईल, तसं आमच्या पक्षात…”

परिसरात सुमारे दोन लाख विविध वनस्पती आहेत. मात्र साताऱ्यात डोंगरउतारावर वाढत्या नागरिकरणामुळे या ठिकाणी सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. त्यामुळे परिसरातील पशू-पक्ष्यांनी साहजिकच किल्ल्यावर आश्रय घेतला. सध्या पावसाळी वातावरण असल्याने मोर प्रशस्त जागा मिळेल तिथे पिसारा फुलवून नाचताना त्यांच्या अधिवासात आढळतात. सकाळी मॉर्निंग वॉकला येणारे गैरफायदा घेऊन मोरांमध्ये फिरून फोटो व्हिडीओ घेऊन समाज माध्यमावर सोडल्याने गर्दी वाढून मोरांच्या अधिवासाला अडचणीत आणत आहेत. आपण वेगळा अर्थ काढून त्यांच्या अधिवासात घुसखोरी करतो. यापासून लांबच रहा, असे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे.

या परिसरात पहाटेपासून गस्त वाढविली जाईल. सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी येथील मोरांचा वन्य पशुपक्षांचा लांबूनच आनंद घ्यावा. त्यांच्या आनंदात आपण सहभागी होऊ नये. त्यांना चारा व पाणी देऊ नये, अशी विनंती साताऱ्याचे वनपाल सुनील शिंदे यांनी केले.

हेही वाचा – भारतीय जनता पक्षाच्या जागेवर मनसेने केला उमेदवार जाहीर, आता भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!

सर्वसामान्यपणे हा हंगाम मोरांचा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. विणीच्या कालखंडात बहुतांश सर्व सजीवांमध्ये नर त्याच्या सौंदर्यात्मक अंगांचे, त्याच्या बलस्थानचे प्रदर्शन अथवा दिखाऊ स्वरुपातील मांडणी करीत असतो. याच्यामागे खरे तर त्या त्या नरांच्या ठिकाणी असणाऱ्या उच्चतम जनुकीय गुणांचे ते प्रतीक असते, यामधून उद्देश असा की त्याच्या या जनुकीय बल/सौंदर्याला भाळून एखादी उन्नत मादी त्याच्याबरोबर रत होईल आणि त्यामधून पुढील पिढी ही त्याहीपेक्षा उन्नत जनुकीय बल/सौंदर्याचे पुरस्कार करणारी असेल. अशा कोणत्याही ठिकाणी आपण शक्यतो जाऊ नये. निदर्शनास आल्यास इतरांना सांगू नका, त्याची जाहिरात करू नका जेणेकरून या वन्यजीवांच्या नैसर्गिक अंत;प्रेरणेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होईल. – सुनील भोईटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा.