खासदार अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येऊन सात महिने लोटले. परंतु त्यांना आपली ‘नवीन संघ’ जाहीर करता आली नाही. या पाश्र्वभूमीवर पक्षाचे संघटनात्मक काम, कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणारे उपक्रम जवळपास थंडावले आहे.
गेल्या फेब्रुवारीमध्ये चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर सुमारे १५ दिवसांनी त्यांनी मुंबईत या पदाची सूत्र स्वीकारली. चव्हाण यांचे संघटन कौशल्य, एकंदर प्रतिमा लक्षात घेता पक्षात नवचैतन्य निर्माण होईल, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत होते; पण नवे प्रदेशाध्यक्ष लाभल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून पक्षाचे संघटनात्मक कार्य जवळजवळ ठप्प आहे.
चव्हाण यांच्या नव्या कार्यकारिणीला अजून मुहूर्त का लागला नाही, याचे कारण त्यांच्या निकटवर्तीयांनाही सांगता आले नाही.
पक्षातील सर्व सदस्यांच्या नावांची यादी चव्हाण यांनी वेगवेगळ्या विभागांतील आपल्या निकटवर्तीयांना दिली होती. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस या व अन्य पदांवर वेगवेगळ्या विभागांतून कोणाची वर्णी लावता येईल, या दृष्टीने नावे काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती; पण हे काम पुढे सरकलेले नाही, असे सांगण्यात आले.
प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी कृतिशील नाही. त्यामुळे शहर-जिल्हा समित्यांच्या कारभारात मोठी शिथिलता आली आहे. फडणवीस सरकारला वर्ष पूर्ण होत असताना या सरकारच्या एकूण कामगिरीवर नैराश्याचे ढग दाटले आहेत; पण त्याचा पंचनामा काँग्रेसला प्रभावीपणे करता आला नाही.
अनेक जिल्ह्य़ांत सदस्य नोंदणी अभियानाचे काम नीट झाले नाही. नांदेड शहरात काँग्रेस पक्षाचा वरचष्मा आहे, येथील मनपा पक्षाच्या ताब्यात आहे; पण सदस्य नोंदणीची आकडेवारी मध्यंतरी समोर आली तेव्हा शहरात सदस्य नोंदणीचे काम झालेच नसल्याचे दिसून आले.
चव्हाण बुधवारी (दि. २८) ५८ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होईल, असे वाटत होते; पण दुष्काळी स्थिती लक्षात घेता चव्हाण यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे नांदेड जिल्हा व शहर शाखेच्या अध्यक्षांनी कळविले आहे. चव्हाण जन्मदिनी मुंबईत थांबणार असून त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते येथून जाण्याच्या तयारीत आहेत.
संवाद नाही, संपर्क तुटला!
’पूर्वीच्या कार्यकारिणीतील काही पदाधिकारी ‘टिळक भवन’मधील कारभार हाकत असले, तरी पक्षाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने पक्षाला व्यापक स्वरुपाचे कार्यक्रम करता आले नाहीत.
’प्रदेश काँग्रेस समितीत पक्षाचे खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते व विविध जिल्ह्य़ांतील सदस्य असे एकंदर ६०० जण आहेत.
’पक्षामध्ये अलीकडेच महिला आघाडीतील नियुक्त्या झाल्या. त्याचे स्वागत होण्याऐवजी सडकून टीका.
’माणिकराव ठाकरे यांच्या काळात पक्ष संघटनेचे अस्तित्व जाणवत होते. प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्यात ‘व्हिडिओ कॉन्फरसींग’ने संपर्क-संवाद होत असे; पण आता ही व्यवस्था जवळपास बंद पडल्यात जमा.