किशोर वय म्हणजे एक न कळते वय. याच वयात घरी पालकांकडून केल्या जाणाऱ्या चांगल्या-वाईट कृतींचे संस्कार होत असतात. घरात कधी तरी आणून ठेवलेली मदिरा न कळत्या वयात किशोरवयीन मुलीच्या हाती पडली अन् जतमधील एका माध्यमिक शाळेतील चार मुलींनी या पेयाची  नशा अनुभवली. झिंगलेल्या अवस्थेतील या मुलींनी मग शाळेतील शिक्षकांच्याही तोंडचे पाणी पळविले. मात्र, खरा प्रकार समोर येताच मुलांपेक्षा पालकांनाच शिक्षणाची गरज असल्याचे समोर आले.

पालकांकडून केल्या जाणाऱ्या चांगल्या-वाईट कृतींचे शाळकरी मुलांच्याकडून अनुकरण केले जाते. कधी जिज्ञासेपोटी, तर कधी उत्सुकतेपोटी हे होते. मात्र, जतमधील शाळकरी मुलीने जिज्ञासेपोटी मदिरा दप्तरातून शाळेत आणली. या अनोख्या द्रव्याची लज्जत आपल्या तीन मत्रिणींनाही दिली. यानंतर व्हायचा तोच परिणाम झाला. या मुली शाळेतच झिंगल्याने याचा बोभाटा झाला. मात्र, शाळेच्या शिक्षकांनी पालकांना बोलावून घडल्या प्रकारापासून धडा घेण्याचे आवाहन केले.

जतमधील एका शाळेत नववीत शिकणारी मुले. चार दिवसापूर्वी नेहमीप्रमाणे शाळाही भरली. मात्र, यातील एका मुलीने शाळेच्या दप्तरात लपवून घरात रोज पालकाकडून घेतल्या जाणाऱ्या व तिच्या समजूतीप्रमाणे शीतपेय असलेली बाटलीही आणली. मधली सुट्टी झाल्यानंतर या शीतपेयाची चव तरी कशी आहे हे पाहण्याची जिज्ञासा म्हणून पेय चाखून बघण्याचे ठरविले.

मात्र, एकटीनेच कुठे चव पाहायची, यासाठी अन्य तीन वर्ग मत्रिणींना सोबत घेतले. चारही मुलींनी या शीतपेयाची चव चाखली. कडवट चवीचे शीतपेय पोटात गेल्यानंतर काही काळाने त्याचा अंमल सुरू झाला. मग बाष्कळ बडबड सुरू झाली. वर्गातच धिंगाणा सुरू केला. ही बाब शिक्षकांच्या कानावर जाताच त्यांनी चौकशी करीत असताना मद्याचा वास येत असल्याचे लक्षात आले.

या मुलींना बाजूच्या खोलीत जाऊन विचारणा केल्यानंतर खरा प्रकार लक्षात आला. यामुळे शिक्षकही अचंबित झाले. या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी मुलीच्या पालकांना शाळेत पाचारण करण्यात आले. त्यांना खोदून खोदून विचारले असता घरच्या फ्रिजमध्ये कधीतरी घेण्यासाठी ठेवलेली मद्याची बाटली मुलीने नकळत आणली असल्याचे स्पष्ट झाले. यातून हा प्रकार घडला. या मुलींना शिक्षकांनी समजावून सांगत असतानाच पालकांनाही समजावून सांगण्याची वेळ आली.