दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या अटकेनंतर इंडिया आघाडीतले आम आदमी पार्टीचे सर्व मित्र पक्ष केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. इंडिया आघाडीमधील सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षदेखील केजरीवाल यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. राष्ट्रवादीने केजरीवाल यांना झालेल्या अटकेचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज सकाळी (शुक्रवार, २२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन या अटकेवरून केंद्रातल्या मोदी सरकारला धारेवर धरलं.

शरद पवार म्हणाले, मोदी सरकारने ईडी आणि सीबीआयला देशभरातल्या विरोधी पक्षांमधील नेत्यांच्या मागे लावलं आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी थेट वेगवेगळ्या राज्यांच्या प्रमुखांना अटक करण्याचं सत्र सुरू केलंय असं दिसतंय. त्यांनी आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं. त्यापाठोपाठ आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून ही अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारचं एक धोरण ठरवलं म्हणून अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे.

अरविंद केजरीवालांना केलेली ही अटक भाजपासाठी बुमरँग ठरेल. याचा १०० टक्के भाजपालाच फटका बसेल. भाजपाला या अटकेची मोठी किंमत मोजावी लागेल. अरविंद केजरीवाल हे एका सामान्य कुटुंबातून आले आहेत. तरीसुद्धा लोकांचा विश्वास संपादन करून ते तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. दिल्लीच्या मागील दोन्ही निवडणुकांमध्ये (२०१५, २०२० मधील दिल्ली विधानसभा निवडणुका) त्यांना ९० टक्के मतं मिळाली आहेत. त्याआधीच्या निवडणुकीतही त्यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती. निवडणूक काळात भाजपाने आम आदमी पार्टीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु, दिल्लीतल्या जनतेने आपवरच विश्वास दाखवला. याचा अर्थ दिल्लीच्या जनतेला केजरीवाल यांचं नेतृत्व मान्य आहे. परंतु, तुम्ही (भाजपा) एका चांगल्या माणसाला तुरुंगात टाकता, त्याचा लोकशाहीचा अधिकार हिरावता, हे लोकांना आवडलेलं नाही. हे सगळं केवळ निवडणुकीसाठी चालू आहे.

हे ही वाचा >> Kejriwal Arrested : “मोदी घाबरट हुकूमशहा”, राहुल गांधींची कडवी टीका; म्हणाले, “त्या असुरी शक्तीला…”

शरद पवार म्हणाले, अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान मोदींच्या भूमिकेला दिल्लीत बसून विरोध करण्याची हिंमत दाखवतात. हेच भाजपाला सहन होत नाही. परंतु, आता इंडिया आघाडीने भूमिका घेतली आहे की, आपण केजरीवाल यांच्या पाठिशी उभं राहायचं. तमिळनाडू आणि झारखंडमध्ये जे झालं तेच आता दिल्लीत होतंय. उद्या हे देशभरात इतर ठिकाणी देखील होईल. भाजपाने देशभरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी भाजपाचा हा सगळा खटाटोप चालू आहे.