राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यापासून या दोन्ही गटांमधील नेते सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख) हे थेट शरद पवारांवर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख) हल्लाबोल करत आहेत. महायुतीतील इतर नेतेही शरद पवारांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, महायुतीला पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महायुतीमधील पक्षांच्या आणि त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या शिंदे गटाने आयोजित केलेल्या प्रचारसभेला हजेरी लावली. राज यांनी कल्याणमधील सभेत बोलताना शरद पवारांना टोला लगावला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे म्हणाले होते, “शरद पवारांनी याआधी अनेक राजकीय पक्ष फोडण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आता त्यांचा पक्षदेखील फुटला आहे.” राज ठाकरे यांच्या या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार म्हणाले, “राज ठाकरे नक्की काय म्हणाले ते मला माहिती नाही. राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं स्थान काय आहे हे देखील मला माहिती नाही. मी असं ऐकलं होतं की त्यांचा नाशिकमध्ये स्ट्राँग बेस आहे (नाशिकमध्ये त्यांचा पक्ष मजबूत स्थितीत आहे). मात्र मला हल्ली नाशिकमध्ये ना ते दिसतात ना त्यांचा पक्ष.”

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार असं म्हणाले होते की “लोकसभा निवडणुकीनंतर अनेक छोटे पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात.” शरद पवारांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या. अशातच भाजपा नेत्यांनी दावे केले की “लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कदाचित शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष (शिवसेना उबाठा) काँग्रेसमध्ये विलीन होईल.” भाजपा नेत्यांच्या या दाव्यांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही इतकी वर्षे भाजपाबरोबर होतो. इतक्या वर्षांमध्ये आम्ही कधी भाजपात विलीन झालो नाही. मग आता आम्ही काँग्रेसमध्ये कसे काय विलीन होऊ? उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी आज (१६ मे) प्रतिक्रिया दिली.”

हे ही वाचा >> “नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”, मोदींच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले, “मी सुचवलेलं की…”

शरद पवार म्हणाले, “मी छोट्या पक्षांबद्दल बोललो होतो. मी काही शिवसेनेबद्दल बोललो नाही. शिवसेना हा खूप मोठा पक्ष आहे. शिवसेना आज विधानसभेत भाजपानंतरचा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे ५६ आमदार निवडून आले होते. तसेच आमचे ५४ आमदार होते. काँग्रेसचे ४० ते 45 आमदार होते. शिवसेना ही विधानसभेमधील एक मोठी शक्ती आहे. त्यामुळे मी त्यांच्या पक्षाबद्दल बोललोच नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar says raj thackeray has no place in maharashtra politics asc
First published on: 16-05-2024 at 11:28 IST