गेल्या विधानसभा निवडणुकीत हातून गेलेला श्रीवर्धन मतदारसंघ परत मिळवण्यासाठी शिवसेनेन मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या समोरील अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. मतदारसंघ नव्याने बांधण्यासाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांना चैतन्य देण्यासाठी येत्या २० एप्रिलला सेनाप्रमुख उद्धव ठाकरे माणगाव इथे जाहीर सभा घेणार आहेत.
  रायगड जिल्ह्य़ातील श्रीवर्धन हा मतदारसंघ हा सेनेचा पारंपरिक बालेकिल्ला होता. या मतदारसंघातून सेनेचे उमेदवार शाम सावंत तीन वेळा निवडून आले होते. मात्र शाम सावंत यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर शिवसेनेत फूट पडली होती. या फुटीमुळे सेनेची वाताहत होईल, अशी अपेक्षा काँग्रेसला होती. मात्र त्याची अपेक्षा धुळीला मिळवत मतदारांनी पुन्हा एकदा सेनेच्या बाजूने कौल दिला होता. या पोटनिवडणुकीतही शाम सावंत यांचा पराभव झाला, तर सेनेचे तुकाराम सुर्वे आमदार झाले.
    यानंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेत सुनील तटकरे यांचा रोहा मतदारसंघ नष्ट झाला. या मतदारसंघातील बराचसा भाग श्रीवर्धन मतदारसंघाला जोडला गेला, तर श्रीवर्धन मतदारसंघाचा काही भाग महाड मतदारसंघात गेला. याचा परिणाम सेनेला गेल्या विधानसभा निवडणुकीत भोगावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसने सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत मतदारसंघ काबीज केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जलसंपदामंत्री सुनील तटकरे विजयी झाले. आता गमावलेला मतदारसंघ पुन्हा बांधण्यासाठी सेनेन जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून श्रीवर्धन मतदारसंघातील माणगाव इथे येत्या २० एप्रिलला सेनाप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.
 मतदारसंघ नव्याने बांधवा आणि पक्षातील कार्यकर्त्यांनमध्ये चैतन्य निर्माण व्हावे, हा या सभेमागचा उद्देश असल्याचे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी सांगितले आहे. संपूर्ण जिल्ह्य़ातून पक्ष कार्यकर्ते या सभेला हजेरी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेच्या नियोजनासाठी मनोहर जोशी यांनी पेण इथे एक आढावा बैठक घेतली. या सभेत जलसंपदामंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा समाचार घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. जनतेच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन असून, दुष्काळ, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, दहशतवाद, विजेचा तुटवडा आणि महागाईसारख्या प्रश्नांनी सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण झाल्याचे जोशी यांनी सांगितले. जनतेच्या मनातील असंतोषाला मोकळी वाट करून देण्यासाठी ही सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जिल्ह्य़ात सध्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे काम सुरू आहे. याला सेनेचा विरोध असून सेनेची भूमिका या सभेत जाहीर केली जाईल, असे जोशी म्हणाले.
दरम्यान, सेनेच्या या आक्रमक भूमिकेने तटकरे यांच्या समोरील अडचणी अधिकच वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सेनेच्या या आक्रमक डावपेचांना तटकरे कसे सामोर जाणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.