कांदिवलीच्या आनंदवन आश्रमाचे अध्यक्ष काशिकानंदगिरी महाराज यांना येथील पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती आध्यात्मिक पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार नाशिकचे शिवानंद सरस्वती महाराज ऊर्फ शिवबाबा यांना तर नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार पुण्याचे पं. विजय जकातदार, शंकर हरी औरंगाबादकर शैक्षणिक पुरस्कार पुण्याचेच डॉ. प्र. ल. गावडे, सर डॉ. मो. स. तथा अप्पासाहेब गोसावी लोकसेवक पुरस्कार मुंबईचे अरुण मोघे तर आदर्श संस्था पुरस्कार नाशिक येथील आधार आश्रमास जाहीर झाला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गोविंद पानसे, सचिव कल्पेश गोसावी, संचालक वासुदेव जोशी आदींनी दिली. पुरस्कार प्रदान सोहळा १ मार्च रोजी सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत परशुराम साईखेडकर नाटय़गृहात शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पुणे येथील प.पू. स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास राहणार आहे.  दरम्यान, पुण्यश्लोक मातुश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ३५व्या स्मृतिदिनानिमित्त अनुबंधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात डॉ. वासुदेवराव जोशी लिखित ‘भविष्यवेध’ आणि स्मिता आपटे लिखित ‘सार्थ स्तनवनांजली’ या ग्रंथांचे तसेच प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे संपादित ‘शिवज्योती’ मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे.