शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनी मुलगा अमोल किर्तीकर यांना ईडीकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. गजानन किर्तीकर आज (११ एप्रिल) पत्रकार परिषदेत बोलत होते. देशात भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा असताना ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजे, ईडीमुळे लोकांमध्ये चीड निर्माण होत आहे. ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही, असे खासदार गजानन किर्तीकर म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गजानन किर्तीकर काय म्हणाले?

“शिवसेना-भाजपाच्या युतीमधून मी खासदार झालो, याची मला जाणीव आहे. त्यामुळे युतीधर्म मी पाळलेला आहे. मी १० वर्ष खासदार असताना फार महत्वाचे स्थित्यंतर दिल्लीत पाहायला मिळाली. ३७० कलम, जीएसटी, तिहेरी तलाक, राम मंदिर, अशा अनेक प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केले. ते काम मी जवळून पाहिले. या सर्व गोष्टीमुळे आमची इच्छा आहे की, नरेंद्र मोदी यांनी पाच नाही तर १० वर्ष पंतप्रधान पदावर राहावे. देशातील जनता पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी राहील. मात्र, ४०० पारचा जो नारा लावला, त्यामध्ये कुठेतरी दर्प येता कामा नये”, असे गजानन किर्तीकर म्हणाले.

हेही वाचा : ‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर

ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही

“महायुतीमध्ये शिवसेना आहे. शिवसेनेची मोठी व्होट बँक आहे. याचा फायदा महायुतीमधील उमेदवाराला होत असतो. त्यामुळे आता ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही. येवढा भक्कम पाठिंबा देशामधून भाजपाला आहे. ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. लोक ईडीच्या कारवाईला कंटाळले आहेत. त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत”, असे गजानन किर्तीकर म्हणाले.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांची खिचडी गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. यावर बोलताना गजानन किर्तीकर म्हणाले, “अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांच्यावर खिचडी गैरव्यवहाराचा आरोप आहे. पण देशात सगळीकडे व्यवसाय चालतो. आता करोना आला त्यावेळी संजय माशेलकर यांनी एक कंपनी स्थापन केली. त्यामध्ये सप्लायचे काम अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण करत होते. पण त्या कंपनीत अमोल किर्तीकर हे भागिदार नाहीत. त्या कंपनीला नफा मिळाला, त्यामधून जे मानधन अमोल किर्तीकर यांना मिळाले ते बँकेत टाकले. यामध्ये कोठेही मनी लॉन्ड्रिंग झालेली नाही. आता या प्रकऱणात त्यांची चौकशीदेखील झाली. ती चौकशीही संपली. पण पुन्हा बोलावले जाते आणि टेन्शन दिले जाते. त्यामुळे हे ईडीचे प्रयोग बंद केले पाहिजेत”, असे गजानन किर्तीकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp gajanan kirtikar on bjp politics and amol kirtikar ed gkt