भाजपासोबत अजित पवारांना शरद पवार यांनीच पाठवले या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. मी पाठवले असते तर अजित पवार यांनी भाजपासोबत सरकारच बनवलं असतं, असं अर्धवट काम केलं नसतं असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’ने तयार केलेल्या ‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती डॉ. बाबा कल्याणी यांच्या हस्ते बुधवारी झाले. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी पवार यांची मुलाखत घेतली, त्यावेळी पवार बोलत होते. दरम्यान यासंबंधी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे.

“भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे अशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती. त्यांनी तसा प्रस्तावही दिला होता. मात्र आमची विचारधारा वेगळी असल्याने हे शक्य होणार नसल्याचे मी पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सांगितले. पण तरीही तुम्ही विचार करा, असे मोदी यांनी सांगितले. राज्यात आमचेही (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) काही जमत नव्हते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला बरोबर घ्यावे हा विचार भाजपा नेतृत्वाच्या मनात आला असेल आणि त्यांनी चाचपून पाहिले असेल,” असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.

“मोदींनी सरकार स्थापनेचा प्रस्ताव दिला होता”, शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

संजय राऊतांना याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्याअर्थी शरद पवार हे सांगत आहेत त्याअर्थी ते खरं असायला हवं. कारण त्यावेळी भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी इतकी उत्तेजित झाली होती की काहीही करुन त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची होती. मग याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, याला फोडा, अजित पवारांना गाठा, आमच्या लोकांना गाठा असा मोठा उपक्रम सुरु होता,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

समोर आहेच कोण, हा प्रश्नच निर्थक ! ; ‘सुडाचे राजकारण अंगलट येतेच’; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

“शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला ऑफर होती आणि कुठून काय बोलणी सुरु होती याविषयी आम्हाला माहिती आहे. तेदेखील आमच्यासोबत यासंदर्भात बोलले होते. त्या काळात आम्ही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त काही नव्हतं. कोण काय बोलतंय, कुणाला भेटतंय याबाबत पारदर्शकता होती याबाबत भाजपाला माहिती नव्हतं. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचं सरकार येऊ शकलं नाही,” असं संजय राऊत म्हणाले. “अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. याबद्दल जरा विस्तार करुन सांगण्यास सांगितलं असता ते म्हणाले की, “मी असं म्हणतोय की पारदर्शकता होती. राजकारणात पारदर्शकता असायला हवी. इतकी मोठी घडामोडी घडत असताना कोण काय करत आहे? उद्या काय होणार? संध्याकाळी काय होणार?…आपण महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन घडवण्यासाठी चाललो होतो. कुठेही कोणता दगड आडवा येईल तो काढत राहिलो. आमच्याकडे तेव्हाही जेसीबी चालूच होत्या”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पारदर्शकता असल्याने सगळे आमदार आणि अजित पवार परत आले असंही वक्तव्य त्यांनी केलं.

“मनमोहन सिंग यांच्यासारखा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही”

“लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर मनमोहन सिंग यांच्यासारखा इतका निष्कपट मनाचा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही. त्यांच्या काळात कोणावरही सूडाची कारवाई झाली नाही. ज्यांच्यावर कारवाई होणार होती तेव्हा मनमोहन सिंग यांनी त्यात पुढाकार घेतला. स्वत: शरद पवारांनी ज्यांचे घोडे आज उधळले आहेत त्यांना वाचवलं आहे. राजकारणात संयम महत्वाचा असतो. सत्तेचा आणि राज्यघटनेचा गैरवापर करु नये. राजकारणात हत्तीप्रमाणे उधळू नये, हत्तीही कोसळतात,” असं संजय राऊत म्हणाले.

“मोदी मास्क लावत नाही, म्हणून मी पण लावत नाही”

“निर्बंध आले की पुन्हा एकदा महाराष्ट्राचं अर्थचक्र अडकून पडेल. नोकरी, काम, रोजगार यावर फार मोठं संकट येईल. ते येऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपले पंतप्रधान जरी मास्क लावा सांगत असतील तरी स्वत: मास्क लावत नाहीत. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांचं ऐकतो आणि मास्क लावत नाही. मुख्यमंत्री मास्क लावतात पण मोदी देशाचे नेते असून कुठेही मास्क लावत नाहीत. मोदी मास्क लावत नसल्याने लोकही लावत नाहीत आणि मीदेखील त्यांचं आचरण करतो. त्यामुळे मोदींनीसुद्धा मास्क लावावा, नियमांचं पालन करावं,” अशी उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली.