शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलं आहे. ५ मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहा असं स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने पक्ष निधीमधून ५० कोटी रुपये काढले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता अनिल देसाई यांना समन्स बजावण्यात आलं आहे.

शिवसेनेची तक्रार

काही दिवसांपूर्वीच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि महत्त्वाच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. शिवसेना पक्षाचा निधी ठाकरे गटाकडून वापरला जातो आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली जाते आहे. यामुळेच आता अनिल देसाई यांना समन्स बजावण्यात आलं आहे.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंना भाजपाची ऑफर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” ज्यादिवशी ते…”

प्राप्तीकर विभागाकडून यापूर्वी शिवसेना पक्षाच्या निधीच्या अकाऊंटची माहिती मागवली होती. त्यानंतर आता पुढील चौकशीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना चौकशीला बोलावण्यात आलं आहे. त्यांना ५ मार्चला चौकशीला हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनीच शिंदे गटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी गुन्हा दाखल करतं का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

शिंदे गटाच्या मागणीनंतर अशा प्रकारे कारवाई होत असेल तर आम्ही ते सहन करतो आहोत. आमच्या लोकांना त्रास देणं, समन्स बजावणं हे सगळं चाललं आहे. दोन महिन्यानंतर बंदुका उलट्या फिरलेल्या असतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.