अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला सध्या तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता जाणवते आहे. जिल्हा रुग्णालयातील अनेक वैदय़कीय अधिकाऱ्यांची पदे रिक्तअसल्याने रुग्णसेवेवर परिणाम होतो आहे.
     जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर अर्थात वैद्यकीय अधिकारीवर्ग एकची १९ मंजूर पदे आहेत. त्यापैकी केवळ सात भरलेली आहेत, उर्वरित बारा पदे रिक्त आहेत. यात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाचाही समावेश आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयात एकही सर्जन उपलब्ध नाही. त्यामुळे जवळपास चार ते पाच महिन्यापासून रुग्णालयात एकही सर्जरी होऊ शकलेली नाही.  भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ आणि फिजिशियन यांची प्रत्येकी चार पदे मंजूर असताना केवळ एक पद भरण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण पडतो आहे.  जिल्हा रुग्णालयात साधारणपणे दर आठवडय़ाला २० महिलांची प्रसूती होते. यातील तीन ते चार सर्जरी असतात. जिल्हा रुग्णालयात एकच स्त्री रोगतज्ज्ञ असल्याने त्यांच्यावर रात्रंदिवस काम करण्याची वेळ येते आहे. अवास्तव ताणामुळे डॉक्टर चांगलेच हैराण झाले आहेत.
  दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीवर्ग दोनची ३० मंजूर पदे आहेत. यातील २२ पदे भरलेली आहेत. आठ पदे रिक्त आहेत. मात्र भरलेल्या पदांपैकी तब्बल १४ पदे ही अस्थायी स्वरूपाची आहेत. अस्थायी स्वरूपाचे डॉक्टर हे कधीही नोकरी सोडून जाण्याच्या तयारी असतात, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वर्ग १ आणि वर्ग २ ची रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
अपुऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यामुळे रुग्णसेवा देण्यात अडचणी येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र तरीही उपलब्ध डॉक्टरांच्या मदतीने चांगली आरोग्य सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. आरोग्य विभागाकडून लवकरच रुग्णालयाला तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.