शहर व जिल्ह्य़ातील ज्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रभावी वापर केला आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला, अशा सहा ग्राहकांना जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ‘नाशिक ग्राहकश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीरंगनगर येथील समाजमंदिरात झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ नाठे होते. या वेळी अॅड. मिलिंद चिंधडे यांना वीज तक्रार, योगेश मेतकर यांना गॅस प्रश्न, विठ्ठल जाधव व चांदोरी येथील शिवाजी मोरे, आंबे शिवनई येथील कृष्णा गडकरी, वडाळीभोई येथील नितीन ठोंबरे यांनी वीज प्रश्नात ग्राहक कायदा व वीज कायदा यांचा प्रभावी वापर करून न्याय मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला. या वेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव विलास देवळे यांनी मार्गदर्शन केले. ग्राहक संरक्षण कायदा संमत होऊन २५ वर्षे झाली. परंतु जोपर्यंत ग्राहक निर्भयपणे व जागृतपणे लेखी तक्रार करणार नाही, तोपर्यंत त्याला न्याय मिळणार नाही. त्यामुळे आजपासून ग्राहकांनी ‘ग्राहक डोळा’ लावून जागृतपणे तक्रारी कराव्यात, असे आवाहन केले. या वेळी निर्मला अष्टपुत्रे, अनिल नांदोडे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.