“विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा”, अशी विनवणी भर मेळाव्यात अजित पवारांनी केल्यानंतर राष्ट्रवादीत खदखद सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा अजित पवारांबाबत मोठं भाष्य केलं आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
संजय शिरसाट म्हणाले की, “अजित पवार मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. ते त्यांच्याच मेळाव्यात विनवणी करतात की मला विरोधी पक्षनेते पद नको, मला पक्षाची जबाबदारी द्या. हे केविलवाणंच झालं. त्यांनी जेव्हा ही मागणी केली तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून दाद दिली. राष्ट्रवादीला पुढे घेऊन जायचं काम कोणी करेल तर ते अजित पवार करतील, हे कार्यकर्त्यांचंही मत आहे. पण अजित पवारांना जबाबदारी देतील असं मला वाटत नाही. आपला पक्ष अजित दादांच्या हातात देणं हे काही जणांना आवडणार नाही. आत्मियता आणि आदर दाखवणे पण प्रत्यक्षात (अजित पवारांच्या) विरोधात काम केलं जातं”, असं संजय शिरसाट म्हणाले.
हेही वाचा >> “बिहारींना हाकलवून लावणारे…”, विरोधकांच्या बैठकीवरून संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला, म्हणाले…
“अजित पवारांना प्रमुख करणं हे काही राष्ट्रवादीतील नेत्यांना परवडणारं नाही. म्हणून त्यांना डावललं जात नाही. गेल्या वळेला मुख्यमंत्री पद त्यांना मिळणार होतं. पण स्वतःहून काँग्रेसच्या गळ्यात टाकलं. मुख्यमंत्री झाले असते तर काय झालं असतं? उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं तर काय झालं असतं? कोणतं आभाळ कोसळणार होतं? पण नाही, त्यांची (एकनाथ शिंदे) इमेज वाढली तर आपल्याला धक्का बसेल ही जी ठाकरेंची भूमिका होती तीच भूमिका अजित दादांबद्दल राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे अजित दादा एक दिवस उठाव करतील असं माझं मत आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.
हेही वाचा >> संयुक्त विरोधी पक्षांच्या बैठकीवरून संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; म्हणाले, “मेहबुबा मुफ्तींसह…”
“सकाळची शपथ कोणाच्या सांगण्यावरून घेतली हे महाराष्ट्राला कळालं. म्हणजे बळीचा बकरा करताना तुम्हाला अजितदादा चालतो. जे जे शपथविधीला होते, ते मंत्रिमंडळात सगळे कसे आले? म्हणजे त्यांना बक्षिसी दिली ना. बळी देताना अजित दादा आणि देण्याची वेळ आली की ते बंडखोर. ही भूमिका उद्धव ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे हा उठाव झाला. तसाच उठाव अजित दादांबाबत होईल”, असंही संजय शिरसाट म्हणाले.